शेतात पाणी साचल्याने पिके कुजली

-परतीच्या पावसानेही दैना
-पिकांची वाढ खुंटली

कराड – जुलै महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे कराड तालुक्‍यातील खरीप पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे तेथील पिके कुजू लागली आहेत. यामुळेच तालुक्‍यातील खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने ऊसासह अन्य पिकांची वाढही खुंटली आहे.

यंदा सरासरी एवढा पाऊस राज्यात पडेल असे हवामान खात्याने पावसाळ्यापूर्वीच जाहीर केले होते. मात्र जून महिन्यात पावसाने सरासरी न गाठल्याने शेतकरी वर्ग चांगलाच हवालदिल झाला होता. पुरेसा पाऊस न पडल्यास आपल्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते या कारणामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या नव्हत्या. मात्र जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यासह कराडला झोडपून काढले.

संततधार पावसामुळे तालुक्‍यातील रेठरे, वडगाव, आटके, मसूर, उंब्रज, काले, वाठार, शेणोली, तांबवे यासह अन्य ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यानंतर पिके उगवणीसाठी आवश्‍यक पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील या पावसामुळे समाधान दिसू लागले. त्यांनी पेरणीची कामे उरकली. शेतकऱ्यांना हवा तेवढा पाऊस मिळाला याचे समाधान दिसून येत होते. शेतीपूरक पाऊस झाला. मात्र पिकांच्या गरजेपेक्षा जास्त व सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तालुक्‍यातील शेतात पाणी साचले आहे.

परतीचा पाऊस तरी पडणार नाही, अशी आशा होती. मात्र परतीच्या पावसाने देखील तालुक्‍याला चांगले झोडपले असून अधूनमधून विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरूच आहे. कोयनाधरण क्षेत्रात पावसाचा जोर यंदा वाढल्याने धरणात देखील पुरेसा पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचा विसर्ग कोयना धरणातून सुरू असल्यामुळे व पडणाऱ्या पावसामुळे कराड तालुक्‍यातील कोयना नदीकाठी असलेल्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.

भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, भात, उडीद, मका यासारख्या पिकांना आता धोका पोहोचला असून बऱ्याच शेतजमिनीतील अशी पिके पाणी साचल्याने कुजू लागली आहेत. त्याचबरोबर या अतिपावसामुळे पिकांवर रोग पडू लागले आहेत.हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे पीक मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे.

तालुक्‍यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पिकांना पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेला सूर्यप्रकाश पुरेसा न मिळाल्याने भुईमूग, मका, सोयाबीन, उडीद, तूर, मूग, भात यासारख्या खरीप पिकांची नियमित वाढ झालेली नाही. ढगाळ वातावरण सूर्य प्रकाशाची कमतरता यामुळे अशा पिकांची वाढ खुंटलेली आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनावर पावसाचा परिणाम होणार आहे.

यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडत आहे. कराड तालुक्‍यातील बरीच शेतजमीन ही बागायत असल्याने या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे पिकांबरोबरच चाऱ्यासाठी वापरात येणाऱ्या हत्तीगवत, गवत, ऊसाची पाचट कुजली आहे. ओल्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे आत्ता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर पर्याय म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये साठवलेल्या कडबाही संपत आला असून परतीच्या पावसाने पुरती दैना झाल्याच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here