- डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
पिंपरी – एका अठरा महिन्याच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथील डॉक्टरांनी या मुलाच्या पोटातून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचे अविकसित मृत गर्भ काढून मुलाचे प्राण वाचविले. ही शस्त्रक्रिया तब्बल सहा तास चालली.
मुलाच्या पोटात गर्भ आढळण्याच्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत “फिट्स इन फिटू’ असे म्हणतात. नेपाळमधील रहिवाशी असलेल्या महिलेची अठरा महिन्यापूर्वी प्रसूती झाली होती. त्यांना मुलगा झाला. मुलाला दिवसेंदिवस आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या. त्याचे पोट वाढत होते. त्याच्या उपचारासाठी मुलाच्या आई-वडिलांनी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ. शैलजा माने यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली. मुलाच्या आरोग्याबाबत त्वरित सर्व विभागाशी समन्वय साधून उपचार सुरू केले.
जगभरात आतापर्यंत अशी केवळ 200 प्रकरणे
डॉ. शैलजा माने यांनी सांगितले की, आईचा पोटात दोन गर्भ तयार झाले होते. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. पुढे जन्मानंतर देखील बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत होती. त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवर ही गंभीर परिणाम झाला असता. त्यासाठी ही गाठ शरीराबाहेर काढणे महत्वाचे होते. पाच लाख बालकांमधून एक अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार, 200 अशी प्रकरणे आजपर्यत नोंदविलेली आहेत. हा मृत गर्भ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते.
कोणत्याही अवयवांना इजा नाही
रेडिओलॉजिस्ट डॉ. विकास जाधव आणि डॉ. संजय खळदकर यांनी रुग्णाची सोनोग्राफी व सीटी स्कॅन अहवालाचे मूल्यमापन केले. त्यानुसार हा गर्भ बाळाच्या यकृत व उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध असून तो मोठ्या रक्तवाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आले. हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले. बाळाच्या सर्व आरोग्य तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत व मूत्राशय, आतडे या अवयवांना कोणतीही इजा न होता ही संपूर्ण गाठ काढण्यात बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव व त्यांच्या टीमला यश मिळाले.
550 ग्रॅम वजनाची गर्भगाठ
ही शस्त्रक्रिया सहा तासात पूर्ण झाली. त्यानंतर डॉ. शिल्पा बाविस्कर यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. या उपचारांना मुलाने सकारात्मक प्रतिसाद दिला. मुलाच्या सर्व तपासण्या केल्या आहेत. गर्भ गाठीपासून त्या बालकाला कोणताच धोका व दोष नसल्याचे स्पष्ट झाले. गर्भ गाठीचे वजन 550 ग्रॅम आहे. गर्भ गाठीच्या परीक्षणात हात व पायाची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोपमध्ये इतरही अवयव दिसून आले. मुलावर सर्व उपचार पूर्ण झाले असून तो आता सामान्य जीवन जगू शकतो. त्याला घरी सोडण्यात आले.
पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. चारूशीला गोरे, डॉ. विद्या विश्वनाथ आणि पथक, भुल विभाग प्रमुख डॉ. स्मिता जोशी, बालरोग व भूलतज्ज्ञ डॉ. सोनल खटावकर आदी डॉक्टरांचे शस्त्रक्रियेदरम्यान सहकार्य मिळाले. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांचे बालरोग विभाग प्रमुख डॉ शरद आगरखेडकर यांनी कौतुक केले.