वीकेन्डचा मुहूर्त साधत शालेय साहित्य खरेदीचा “उत्सव’

बाजारात झुंबड : सर्व प्रकारच्या साहित्यांच्या दरात यंदा 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ, पालकांना आर्थिक फटका

क्रिकेटपटू, छोटा भीम, बार्बी, मोटारींचे चित्र असलेल्या साहित्यांना मागणी

…शाळांतही “दुकान’

इंग्रजी माध्यमांच्या बहुसंख्य शाळांनी वह्या-पुस्तके व गणवेश यांच्यासाठी काही ठराविक दुकाने निश्‍चित केलेली असतात. त्याच दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे बंधने शाळांकडून पालकांना घालण्यात आली आहेत. काही शाळांमध्ये दुकानदार काही दिवस येऊन बसतात व साहित्याची विक्री करतात. हे दुकानदार म्हणेल तेवढी किंमत पालकांना मोजावीच लागते. त्यामुळे या “दुकानदारी’ला चाप घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे – शहरातील शाळा सोमवारपासून (दि.17) सुरू होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची झुंबड उडाली आहे. यंदा साहित्य खरेदीच्या किंमतीत 10 ते 20 टक्‍के वाढ झाली असून ही आर्थिक झळ पालकांना सोसावी लागत आहे. शनिवार आणि रविवारचे औचित्य साधून पालक आणि विद्यार्थ्यांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे.

शाळांच्या सुट्ट्या संपत आल्या असून आता पुन्हा शाळा सुरू होणार आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आनंद लुटला आहे. आता पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. शालेय साहित्याच्या खरेदीची यादी तयार करुन ती पालकांच्या हाती सोपविण्यात येत आहे. प्रामुख्याने बहुसंख्य पालकांना आप्पा बळवंत चौकातील दुकानांकडे धाव घेतल्याचे चित्र आहे. काही पालकांनी आपल्या घराजवळील दुकानांमधूनही साहित्याची खरेदी करण्याला प्राधान्य दिल्याचे आढळून येते. शालेय साहित्यालाही जीएसटी लागू करण्यात आला आहे.

बाजारात विविध प्रकारच्या स्कूल बॅग दाखल झाल्या आहेत. यात क्रिकेटपटूंची चित्रे, छोटा भीम, बार्बी, मोटारी आदींची चित्रे असलेल्या बॅग खरेदी करण्याला विद्यार्थ्यांकडून अधिकची पसंती देण्यात आली आहे. वह्या, पेन, पेन्सिल, जेवणाचा डबा, पाणी बॉटल, कंपास पेटी, चित्रकलाचे साहित्य, विज्ञान किट आदीसह इतर विविध साहित्यांची विद्यार्थ्यांनी आपआपल्या आवडीप्रमाणे निवड केली आहे. वह्या-पुस्तकांना लावण्यासाठी खाकी व प्लॅस्टिकच्या कव्हर्सची खरेदी करण्यात आली.

प्रोजेक्‍टसाठी लागणारे विविध साहित्य, वार्षिक नियोजन रजिस्टर, काळा-पांढरा फळा, पुस्तके, डायऱ्या यांचीही पालकांनी खरेदी केल्याचे दिसून आले. पावसाळ्यापासून बचाव व्हावा, यासाठी विविध रंगी रेनकोट, छत्र्याही विकत घेण्यात आल्या. बूट, सॉक्‍सची खरेदीही करण्यात आली आहे. मुख्य बाजारपेठेसह उपनगरातही सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी ना-नफा-ना-तोटा या तत्वावर वही विक्री स्टॉल उभारले आहेत. होलसेल दरात साहित्य मिळेल, असे फलकही काही दुकानदारांनी झळकविले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.