दुर्मीळ वनस्पतींवर जाणवला परिणाम

लांबलेल्या पावसामुळे फुलांचा बहर चुकला : पर्यावरण चक्रात होणार मोठे बदल

पुणे – लांबलेल्या पावसाचा परिणाम शहर परिसरातील दुर्मीळ वनस्पतींवर झाला असल्याचे निरीक्षण अभ्यासकांकडून वर्तविण्यात आले आहे. या पावसामुळे या वनस्पतींची फुले येण्याचा काळ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होता. पण त्या वनस्पतींचा बहर कालावधी चुकल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम या फुलांवर आधारित कीटक आणि पक्ष्यांवरदेखील झाला असून हा प्रकार कायम राहिल्यास पर्यावरण चक्रात मोठे बदल घडण्याची शक्‍यता अभ्यासकांकडून वर्तविण्यात आली आहे.

सामान्यपणे ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाच्या परतीची सुरुवात होते. याच काळात शहरालगतच्या डोंगराळ भागांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती बहरतात. अनेक वनस्पती नव्याने उगवतात तर काहींना बहर येतो. हा फुलांचा बहर पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो; कारण यावर इतर सजीव अवलंबून असतात. मात्र, यंदा लांबलेल्या पावसामुळे ही पर्यावरण साखळी प्रभावित झाली असून अनेक वनस्पतींचा फुले येणाच्या काळ हा संपुष्टात आला आहे, तर काही वनस्पतींना उशिराने फुले येत असल्याचे निरीक्षण भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागातील शास्त्रज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.

याबाबत संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. जीवन जलाल म्हणाले, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती आढळतात. यातील शेकडो वनस्पती या पावसाळा संपताच बहरू लागतात. मात्र, यंदा पावसाच्या लांबणीमुळे या वनस्पतींवर स्वाभाविकत: परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. सद्यःस्थितीत हा बदल परिस्थितीजन्य असला तरी आगामी वर्षात पावासाचे प्रमाण असेच राहिल्यास यातून वनस्पतींच्या जीवनचक्रात मोठे बदल होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

पावसामुळेच “कास’ फुलण्यास उशीर
विविध प्रकारच्या दुर्मीळ फुलांसाठी प्रसिद्ध असलेले कास पठार अद्यापही बहरलेले नाही. सर्वसामान्यपणे सप्टेंबर महिन्यापासून याठिकाणी विविध प्रकारची फुले उगवतात. मात्र, यंदा लांबलेला पावसाचा परिणाम झाल्याने याठिकाणी अद्याप फुले उगवली नाही. या फुलांचा उगवण्याचा कालावधी चुकल्यानेच फुले उगवण्यास उशीर होणार असल्याचे निरीक्षण अभ्यासकांकडून नोंदविण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)