चीनमध्ये विचित्र विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. या विषाणूने बाधित व्यक्ती चीनबाहेर अनेक देशांत आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटना यासंदर्भात बैठक घेऊन जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याजोगे या आजाराचे स्वरूप आहे का, याचा आढावा घेणार आहे. सामान्यतः जनावरांमधून संक्रमित होणारे हे विषाणू एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडेही झपाट्याने संक्रमित होत असल्याचे आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
चीनमधील वुहान शहरात तसेच बीजिंग आणि शेनजेन येथे विचित्र आजाराचे विषाणू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या विचित्र विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या दोनशेवर पोहोचली आहे. श्वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या या आजाराने आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ब्रिटनमधील काही तज्ज्ञांच्या मते, चीनच्या सरकारकडून अपूर्ण माहिती दिली जात असून, प्रत्यक्षात बाधित रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस प्रकारातील हा विषाणू सर्वांत आधी डिसेंबरमध्ये आढळून आला होता; पण आता चीनच्या सीमा ओलांडून हा विषाणू सर्वत्र पसरू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उदाहरणार्थ, जपानमध्ये एक आणि थायलंडमध्ये दोन रुग्ण कोरोना व्हायरसने बाधित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या नव्या विषाणूचे स्वरूप, त्यामुळे रुग्णामध्ये दिसून येणारी लक्षणे आणि परिणाम याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
रुग्णांच्या शरीरातून घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या माध्यमातून या विषाणूचे परीक्षण प्रयोगशाळेत करण्यात आले. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना व्हायरस असल्याचे सांगितले. कोरोना व्हायरस अनेक प्रकारचे असतात. मात्र, त्यातील सहा प्रकारच्या विषाणूंची बाधा माणसाला होऊ शकते, असे मानले जाते. नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर ही संख्या सातवर पोहोचली आहे. नव्या विषाणूच्या जनुकीय विश्लेषणानंतर असे दिसून आले आहे की, माणसाला बाधा होण्याची क्षमता असणाऱ्या कोरोना प्रकारातील विषाणूंपैकी “सार्स’ नावाच्या विषाणूशी नव्या विषाणूचे साधर्म्य आढळते. सार्स हा अत्यंत धोकादायक विषाणू मानला जातो. 2002 मध्ये चीनमधील 8098 जणांना सार्स विषाणूची बाधा झाली होती आणि त्यातील 774 जणांचा मृत्यू झाला होता.
चीनमधील वुहान शहरातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत 136 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच, या विषाणूची लागण झाल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या आजाराने दगावलेल्या लोकांची संख्या तीन झाली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा अधिकाऱ्यांनी सांगितले की, वुहान शहरात 170 जणांवर उपचार सुरू आहेत आणि त्यातील नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शेनजेन शहरातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका 66 वर्षीय रुग्णामध्ये या विषाणूची लागण झाल्याची लक्षणे दिसून आली आहेत. हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच वुहान शहरात आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेला होता आणि तेथेच त्याला या विषाणूची लागण झाली असे कारण सांगितले जाते. या विषाणूवर आताही नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने यापूर्वी सांगितले होते.
कोरोना प्रकारातील या विषाणूची लागण झालेल्या रुग्णामध्ये सामान्यतः सर्दी, पडसे अशी लक्षणे दिसून येतात. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथील प्रा. मार्क वूलहाऊस यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची लागण होणे एवढे धोकादायक का आहे, हे आपल्याला हा विषाणू पाहिल्यानंतर कळून आले. या विषाणूमुळे होणारी सर्दी, पडसे सर्वसामान्य नसते. हा अगदीच नवीन प्रकारचा विषाणू आहे. अशा प्रकारचे विषाणू एक तर एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात किंवा माणसांना बाधित करतात. ही प्रक्रिया अजिबात समजून येत नाही. नॉटिंगहॅम विद्यापीठातील व्हायरोलॉजिस्ट प्रा. जोनाथन बॉल यांच्या मते, कोरोना विषाणूची ही अगदीच वेगळी प्रजाती आहे. हे विषाणू जनावरांच्या शरीरातून माणसाच्या शरीरात आले असावेत, अशीच शक्यता अधिक आहे. सार्स हा विषाणूही मांजरांच्या एका प्रजातीतून माणसाच्या शरीरात पोहोचला होता.
आता महत्त्वाचा प्रश्न असा की, चीनमधून या विषाणूने सीमोल्लंघन केले असल्यामुळे भारतावर त्याचा कितपत परिणाम होणार? ही शक्यता गृहित धरून भारतात विशेष काळजी घेण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोची आणि कोलकाता विमानतळांवर “थर्मल स्क्रीनिंग’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
चीन आणि हॉंगकॉंगहून आलेल्या प्रवाशांची ही चाचणी घेण्यात येईल. प्रवाशांना विमानात बसण्यापूर्वी सेल्फ रिपोर्टिंग फॉर्मसुद्धा भरावा लागणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, देशातील सात विमानतळांवर सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टिमचे पालन व्हावे या उद्देशाने सर्व विमानतळांच्या संपर्कात सतत असल्याचा मंत्रालयाचा दावा आहे. याखेरीज या धोकादायक विषाणूबद्दल सर्व विमानतळांवर उद्घोषणा करून माहिती देण्यात येत आहे. हा संसर्गजन्य विषाणू असून, एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात तो प्रवेश करू शकत असल्यामुळे धोका अधिक वाढला आहे. चीनमध्ये या विषाणूंमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. संसर्ग झालेल्या लोकांची संख्याही वाढली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूंच्या फैलावासंदर्भात एक तातडीची बैठक बोलावली आहे. कोरोना व्हायरसमुळे पसरणाऱ्या आजारांच्या घटनेला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करण्याची गरज आहे किंवा कसे, यासंबंधी संघटनेत विचारविनिमय होणार आहे. कारण अमेरिकेतही अशा विषाणूंनी ग्रस्त असलेला एक रुग्ण समोर आला आहे. हा रुग्ण चीनमधील वुहान शहरातून अमेरिकेत आला आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील या एका उदाहरणापूर्वी थायलंडमध्ये आणि जपानमध्येही या विषाणूंचा फैलाव झाल्याचे दिसून आल्यामुळे जगभरात याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रकारातील विषाणूंच्या संक्रमणामुळे जी लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात, त्यात डोकेदुखी, नाक वाहू लागणे, खोकला, गळ्यात खवखव, ताप, अस्वस्थतेचा अनुभव, शिंका येणे, अस्थम्याच्या त्रासात वाढ होणे, थकवा जाणवणे, न्युमोनिया, फुफ्फुसांची सूज ही प्रमुख लक्षणे आहेत.
चीनमध्येच या विषाणूचा अधिक फैलाव होण्याची कारणे काय असावीत, याचा शोध घेतला असता प्रा. वूलहाउस यांना असे आढळून आले की, लोकसंख्या आणि तिचे घनत्व यामुळे चीनमधील लोक जनावरांच्या संपर्कात लवकर येतात. त्यामुळे जनावरांच्या शरीरातून माणसाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांबद्दल यापुढेही चीनमध्येच आणखी काही घटना समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जनावरांमधून माणसांमध्ये हा विषाणू शिरकाव करीत असला, तरी एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला संक्रमण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांची देखभाल करणारे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही या विषाणूने घेरल्याची उदाहरणे समोर आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा विषाणू सर्वांत आधी फुफ्फुसांवर आघात करतो आणि त्यामुळेच विषाणूची भयावहता वाढते. त्यामुळेच या विषाणूचे संक्रमण झाल्याबरोबर रुग्णाला खोकला आणि सर्दी, कफ आदी त्रास सुरू होतात.
अर्थात जी आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध झाली आहे, तीच अंतिम आहे असे मानता येत नसल्यामुळे या रोगाचा फैलाव नक्की किती प्रमाणात झाला आहे, याबद्दल ठोस कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे घाबरगुंडी उडाली आहे. या विषाणूचा परिणाम मर्यादित स्वरूपाचा असेल, असे सुरुवातीला वाटत होते. परंतु डिसेंबरनंतर या विषाणूने प्रभावित झालेल्या व्यक्तींची प्रकृती प्रचंड प्रमाणात बिघडल्याने तसेच अनेकजणांना त्याची लागण झाल्याने हा समज फोल ठरला. दक्षिण कोरियामध्येही असे काही रुग्ण आढळून आले आहेत. सर्वच बाधित लोकांची ओळख पटली असावी, असे सांगता येत नाही. त्यामुळे बाधित रुग्णांचा आकडा जेवढा सांगितला जातो तेवढाच असण्याची शक्यता नसून, आणखीही रुग्ण असण्याची शक्यता अधिकारी वर्तवितात. नववर्षारंभी चीनमध्ये फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांना त्याची बाधा होऊन तो अनेक देशांमध्ये पसरला असावा, अशीही भीती व्यक्त केली जात असल्यामुळे जगभरात सतर्कता बाळगली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोणती घोषणा केली जाते आणि त्यानंतर कोणत्या उपाययोजना आखल्या जातात, याची जगाला उत्सुकता आहे. त्यावरच या विषाणूची भयावहता नेमकी किती, हे समजणार आहे.
डॉ. जयदेवी पवार