सर्वसामान्य जनतेला आजही पोलिसांची धास्ती

नितीन साळुंखे
“स्मार्ट’ पोलीस ठाण्यांमध्ये सन्मानाची वागणूक मिळण्याची अपेक्षा

नागठाणे  – मोबाइल, वाहन चोरीची तक्रार असो अगर पासपोर्ट, चारित्र्याच्या दाखल्यासंबंधीच्या कामांसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते. मात्र, पोलीस ठाण्याचे नाव काढले की, आजही सर्वसामान्यांच्या अंगावर काटा येतो. पोलीस ठाण्यातील तक्रारींबाबत शंकेचे निरसन कोणाकडून करून घ्यायचे, त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, हे समजत नसल्याने नागरिक गोंधळून जातात. नागरिकांना आवश्‍यक सुविधा व योग्य सल्ला देण्यात पोलीस ठाणी असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे.

पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळावी, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. नवीन अधिकारी रुजू झाला की, नागरिकांना पोलीस ठाण्यात सन्मानाच्या वागणुकीचे आश्‍वासन दिले जाते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार “नव्याचे नऊ दिवस’ म्हणून पोलीस ठाण्यात येणाऱ्यांच्या शंका आणि प्रश्‍नांचे निरसन केले जाते. त्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलत जाते.आज समाजात सुशिक्षितांचे प्रमाण वाढले असले तरी पोलीस ठाण्यात तक्रारी देणे, दाखले मिळवणे अगर शंकेचे निरसन करून घेण्याचे धाडस सर्वसामान्यांना होत नाही.

पायातील चप्पल, बूट पोलीस ठाण्याच्या बाहेर काढून भीत भीत ठाणे अंमलदारापर्यंत जायचे, तेथे नम्रपणे उभे राहायचे, त्याच्या हातातील काम संपेपर्यंत तिष्ठत राहायचे आणि त्यानंतर त्यांना घाबरतच शंका विचारणारी, तक्रारींबाबत संवाद साधणारी एक-दोन मंडळी प्रत्येक पोलीस ठाण्यात रोज पहायला मिळतात. सर्वसामान्यांना पोलीस ठाण्याची, पोलिसांची भीती वाटू नये, यासाठी पोलीस दलाकडून आवश्‍यक पावले उचललेली दिसत नाहीत.

पोलीस आणि जनतेचा एकमेकांशी संवाद असेल तर अनेक संभाव्य छोट्या-मोठ्या गुन्ह्यांना आळा बसू शकतो. याबाबत वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या जातात. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाणी स्मार्ट बनली तरी सामान्यांना आवश्‍यक असलेल्या सुविधांचा अभाव जाणवत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.