संगमनेर, (प्रतिनिधी) – ऐन सणासुदीच्या काळात संगमनेर शहरात दररोज चैन स्नॅचिंग, मोबाईल चोऱ्या होत असून एकही चोर पोलिसांना सापडला नाही. शहर पोलीस हद्दीतील घुलेवाडी, बसस्थानक, देवीगल्ली, दिल्लीनाका,
सय्यदबाबा चौक, अकोले नाका, मार्केट यार्ड परिसर, डी.एड कॉलेज परिसर या भागातून दररोज चोऱ्या होत असून नागरिक तक्रार दाखल करतात. अनेकजण पोलिसांकडून एकही तपास लागत नसल्याने पोलीस ठाण्यात येण टाळतात. अनेकवेळा पोलिसच तक्रार घेण्यास नकार देत असल्याचे बोलले जात आहे
निर्मला जयराम आंबरे (वय ७२) अकोले बसमध्ये चढत असताना ७ तोळे वजनाचे गंठन, त्यात सोन्याचे पँडल व काळे मणी असलेले १ लाख ४० हजार रुपयांचे आणि ४०० रुपये एका अज्ञात व्यक्तीने चोरी केले.
शिवनाथ दगडू कवडे (वय ८१, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) हे शहरातील अकोले बायपास येथे सानप रुग्णालयाच्या समोर रस्त्याच्या कडेला उभे असताना दोन अज्ञात इसम जवळ येऊन हात सफाई करून हातातील ४३ हजार ५०० रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला.
मीनाक्षी बाळासाहेब कोरडे ( वय ५३, रा. संगमनेर) या व सोबत असणाऱ्या राजश्री अशोक खैरनार (वय ६२, रा. ताजणे मळा, संगमनेर) या देविगल्ली येथील राजहंस पतसंथेच्या समोरील रस्त्यावरून जात असताना दोन चोर मोटार सायकलवरून आले.
१ लाख ४० हजार किमतीचा १८ ग्रॅम सोन्याची गंठन तर दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे गंठन असा ३ लाख रुपयांचे सोने हिसकावून पसार झाले.
रोहित मुकुंद जोशी (वय ३६ ) यांची अमृतवाहिनी कॉलेज समोर घरासमोरून दुचाकी (क्र. एम एच १७ सी जी ४६६०) एका अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यावरून दाखल झालेले तक्रारी पाहता संगमनेर शहरासह परिसरात अनेक चोऱ्या वाढल्याचे दिसून येते. कधीकधी सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसत असला तरीही त्याला पकडण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.
एकही चोर पकडला जात नसल्याने संगमनेरसह तालुक्यात पोलिसिंगचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात तरी पोलिसांनी चोख कामे बजावण्याची विनंती नागरिक करत आहेत.