शेतजमीन मोजणीचे काम धालेवाडीत शेतकऱ्यांनी रोखले

धालेवाडी (ता. पुरंदर) :रेल्वे रुंदीकरणाचे मोजणीचे काम शेतकऱ्यांनी रोखत अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जेजुरी – रेल्वे विभागाच्यावतीने दुसऱ्या रेल्वे रुळाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतातून मोजणी सुरु असताना धालेवाडी (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्यांनी मोजणीचे काम रोखले. शेतकऱ्यांनी शेत जमिनीची भरपाई मिळावी, अशी मागणी सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ अभियंता ऋषी पांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे-मिरज या विद्युतवाहिनी रेल्वे रुळाचे काम वेगाने सुरु आहे. नव्याने होणाऱ्या रेल्वे रूळासाठी पुणे सेंट्रल रेल्वे विभागाच्यावतीने शेत जमीन आरक्षित करण्यासाठी मोजणीचे काम सुरु असताना धालेवाडी येथील शेतकऱ्यांनी मोजणी काम बंद पाडले. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने संपादित केलेल्या जमिनीचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

मोजणीचे काम सुरु करताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना किंवा लेखी नोटीस दिलेली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात रेल्वे रूळ रुंदीकरणाचे काम सुरु आहे, ते त्वरित बंद करावे. शेतकऱ्याबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांने भरपाई देण्याविषयी चर्चा करून तसे लेखी आश्‍वासन द्यावे. आमच्याच शेतातील रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. तो त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा.

शेतात रल्वे हद्द दाखविणारे खांब रोवण्याचे काम बंद करावे. अधिकाऱ्यांनी दहशत करू नये यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्वरित रेल्वे प्रशासन व शेतकऱ्यांच्यात सलोखा निर्माण व्हावा यासाठी बैठक घ्यावी या मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी सासवड भूमापन कार्यालयातील अभिजित नवले शेतकरी छबन बाबुराव काळाणे, मुरलीधर बाबुराव काळाणे, शाम माने, शिवाजी कुदळे, सचिन कुदळे, बाळासाहेब काळाणे, विलास कुदळे, रोहिदास कुदळे, विश्‍वास कुदळे हे क्षेत्र बाधित शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.