“पशुसंवर्धन’च्या रिक्तपदांचा शेतकऱ्यांना फटका

दुष्काळामुळे त्रस्त पशुपालकांमध्ये नाराजी ः दोन केंद्रांत डॉक्‍टरांची पदे आहेत रिक्‍त
11 पशुसंवर्धन केंद्र; पशुधन 1 लाख 86 हजार 846
ओंकार दळवी

जामखेड – तालुक्‍यात पशुसंवर्धन विभागातील विविध रिक्त पदांचा फटका पशुपालकांना बसत आहे. खासगी डॉक्‍टरांना अतिरिक्त पैसे देऊन जनावरांवर उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे अगोदरच दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या पशुपालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

तालुक्‍यात शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. दुग्धव्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे पशुधन जीवापाड संभाळले जाते. सध्या तालुक्‍यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे अशक्‍य बनत चालले आहे. सध्या उपलब्ध आसणाऱ्या पाणी व चाऱ्यावर कशी तरी जनावरे जगविली जात आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगवायची कशी, ही मोठी चिंता असताना आजारी जनावरांच्या उपचारासाठी खासगी पशुवैद्यकीयांकडे खिसा रिकामा करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्‍यात यंदा दुष्काळी स्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

नुकत्याच चारा छावण्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू करून 28 छावण्या सुरू करण्यात आल्या. सद्यस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे चारा विकतही घेणे परवडणारे नाही. चारा टंचाईचा सर्वांत जास्त फटका दूध व्यावसायीकांना बसला आहे. चारा उपलब्ध नसल्याने दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. महागामोलाचा चारा विकत घेऊन व्यवसाय करावा लागत आहे. दुष्काळीचा दाहकता आता हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागाता पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. घागरभर पाणी मिळवण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत आहेत. यासोबत जनावरांचाही प्रश्‍न ऐरणीवर आला असून, त्याप्रमाणे पशुपालक शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यांचा धीर सुटण्यास प्रारंभ झाला आहे. अनेकांनी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली आहे.

तालुक्‍यात 11 पशुवैद्यकीय केंद्र आहेत. त्यातील जामखेडमध्ये एक तर तालुक्‍यात अन्य ठिकाणी श्रेणी एकचे तीन केंद्र व श्रेणी दोनचे आठ केंद्र आहेत. यातील जामखेड व खर्डा या ठिकाणीचे पशुधन विकास अधिकारीपद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. पंचायत समिती येथे सहायक पर्यवेक्षक पशुधन पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. नान्नज येथील साहयक पशुधन अधिकारी हे गेल्या दोन महिन्यांपासून मेडिकल रजेवर असल्याने जामखेड येथील पशुधन विस्तार अधिकाऱ्यांना जामखेडसह शेजारी आसणाऱ्या 85 ते 87 गावांना एकट्यानेच जावे लागत आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे खर्डा, जवळा, नान्नज या ठिकाणचाही अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे कुठलीच उपचार सेवा व्यवस्थित होत नाही. सेवा कोलडली असून, पशुपालकांना खासगी व्यक्तींकडे पशुधन घेऊन जावे लागत आहे.

अन्य पदेही आहेत रिक्त

जामखेड, खर्डा, नायगाव, जातेगाव याठिकाणी परिचराची पदे रिक्त आहेत. जामखेड, खर्डा, नान्नज वगळता अन्य ठिकाणी ड्रेसरही नाही. त्यातही नान्नज येथील जागा रिक्त आहे. याचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

 तालुक्‍यातील पशुधनाची स्थिती

तालुक्‍यात सध्या 1 लाख 86 हजार 846 एवढे पशू आहेत. 78 हजार 451 मोठी, 74 हजार 677 लहान जनावरे, तसेच 33 हजार 718 शेळ्या-मेंढ्या आहेत. या पशुधनावर उपचार करण्यासाठी अवश्‍यक तेवढे अधिकारी, कर्मचारी संबधित विभागाकडे 2 वर्षांपासून नाहीत. आहे त्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गाडा हाकलला जातोय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.