शिवारातील ओपन बारमुळे शेतकरी हैराण

कोपर्डेहवेली येथील प्रकार; तळीरामावर कारवाईची मागणी

कोपर्डेहवेली – राज्य शासनाने साधारण एक वर्षापूर्वी अध्यादेश काढल्याने महामार्ग व मुख्य रस्त्यावरील परमिट रूम बियर बार बंद करण्यात आले. यावर तळीरामांनी नामी शक्कल लढवित दारू पिण्यासाठी मुख्य रस्त्यांच्या लगत शेती, शाळा परिसर, मैदान अशा ठिकाणी आपले अड्डे तयार केले. शेतामध्ये ओपन बार बसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू लागले आहे. या तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाच्या बिअरबार बंदी आदेशाचा फटका बहुतांशी मद्यप्रेमींना बसला आहे. मात्र बियरबार बंद असले तरी काही ठिकाणी आजही छुप्प्या पद्धतीने तर काही ठिकाणी उघडपणे मद्य विक्री होताना दिसून येत आहे.

बंदीकाळात बार मालकांकडून मद्यपींना बारमध्ये बसण्यास मज्जाव केला जातो. यामुळे यावर नामी शक्कल लढवित तळीरामांनी आता शिवारातील शेतामध्ये आपले खुले बार सुरु केले आहेत. दारू पिल्यानंतर मद्यपी रिकाम्या दारूच्या बाटल्या शेतामध्येच टाकत असतात तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक रिकाम्या बाटल्या फोडून टाकण्यात येत आहेत. त्यामुळे शेतामध्ये काम करत असताना या काचामुळे शेतकरी व मजुरवर्ग जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा या ओपन बारवर संबंधित यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

दोन दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत कराड-मसूर रस्त्यावर शहापूर गावच्या हद्दीत दारूच्या नशेत अज्ञाताने टाकलेल्या सिगारेट मुळे आग लागून शेतकऱ्याचे 14 गुंठे ऊस पीक व ठिबक संच जळून खाक झाल्यामुळे अंदाजे ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या प्रवृत्तीला पोलिसांनी वेळीच आवरणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात इतर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल.

प्रवीण थोरात,शेतकरी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.