पिंपरी : सुमारे दहा हजार रुपयांची सायकल कोणतीही अनामत रक्कम न घेता केवळ 250-300 रुपये प्रतिमहा भाडेतत्त्वावर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागरिकांना वापरण्यासाठी देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचा व्यायाम तर होणारच परंतु पैशांची बचत आणि प्रदूषणातही घट होणार आहे. या सायकलींकरिता पिंपरी-चिंचवडकरांची झुंबड उडाली आहे.
इंधनाच्या खर्चात होणार बचत; प्रदूषणातही होणार घट
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, कालांतराने सायकलींची ही जागा मोटार सायकलींनी घेतली आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास जरी वेगवान झाला असला तरी इंधनाच्या रूपाने होणारा खर्च आणि प्रदूषणातही वाढ झाली आहे. आता शहरे स्मार्ट होऊ लागली आहे. वाढते प्रदूषण हे नक्कीच शहराला भूषणावह नाही. त्यामुळे आता नागरिक पुन्हा सायकलींकडे वळू लागले आहेत. काहीजण जीममध्ये जाऊन सायकलिंग करताना दिसतात.
महापालिका आणि बाऊन्स सायकल यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत करार केला आहे. या करारानुसार बाऊन्स कंपनी शहरातील नागरिकांना सायकल उपलब्ध करून देणार आहे. सध्या अशाच प्रकारच्या सायकल प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळील संत ज्ञानेश्वर उद्यान, भेळ चौकाजवळील संत तुकाराम उद्यान, आकुर्डी आणि वाल्हेकरवाडी आदी भागांमध्ये तासाला दहा रुपये या दराने उपलब्ध आहेत. मात्र, दरमहा 250-300 रुपये दराने या सायकल चिंचवडगाव परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या कार्यालयात सध्या या सायकलींच्या नोंदणीकरिता नागरिकांची झुंबड उडाली आहे.