फाटक उघडे असतानाच एक्‍सप्रेस गेली धडधडत

जेऊर येथे रेल्वे अपघात टळला : दुचाकीस्वारांच्या सतर्कतेने अनेकांचे वाचले प्राण

नीरा – नीरा-वाल्हे रस्त्यावरील जेऊर येथील रेल्वे फाटक नेहमीप्रमाणे उघडे असल्याने वाहने रूळावरून जात होती. त्याचवेळी हजरत निजाम्मूद्दीन (2629) संपर्क एक्‍सप्रेस वेगाने धडधड करीत आली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. काही दुचाकी चालकांनी आरडा ओरड केल्याने सर्वच वाहने जागीच थांबली आणि मोठा अपघात टळला. काळ आला होता.., पण वेळ आली नव्हती, अशी भावना जरी व्यक्त होत असली तरी या घटनेमुळे रेल्वे प्रशासनावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, नीरा-वाल्हे रस्ता वर्दळीचा आहे. या ठिकाणी जेऊर येथे रेल्वे फाटक असून प्रत्येक 10 ते 20 मिनीटाच्या अंतराने ते बंद होत असते. नेहमी प्रमाणे फाटक उघडे असल्याने लहान-मोठी वाहने रूळ ओलांडत होती. अचानक रेल्वेचा धडधडणारा आवाज येऊ लागल्याने रूळ ओलांडत असलेल्या दुचाकीस्वारांनी प्रचंड आरडाओरडा करीत अन्य चालकांना वाहने थांबविण्यास सांगितले. जेऊर येथील रहिवासी संभाजी ठोंबरे हे आपल्या चारचाकी मारुती अल्टो कारने जेऊरकडे निघाले होते, ते फाटक ओलांडत असतानाच रेल्वे एक्‍सप्रेस वेगाने येत होती. दुचाकीस्वारांनी आरडाओरडा करीत त्यांचे लक्ष वेधीत कार थांबविण्यास सांगितले. ठोंबरे यांनी कार तात्काळ थांबवत ती मागे घेतली; त्याच वेळी रेल्वे रुळावर लावलेला लाल बावटा उडवीत एक्‍सप्रेस जोरात निघून गेली.

आज (दि.10) सकाळी 09:10 वाजता ही घटना घडली. दुचाकीस्वारांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला असला तरी रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सकाळी घडलेल्या या घटनेचा बोभाटा दुपारी 11:00 पर्यंत सर्वत्र झाला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे डिव्हिजनचे चौकशी अधिकारी जॉर्ज यांनी दुपारी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी स्टेशन मास्तरांनी जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न केले. नीरा रेल्वे स्टेशन मास्तर, वाल्हे स्टेशन मास्तरवर जबाबदारी ढकलत होते. तर, वाल्हे स्टेशन मास्तर, मी गेटमनला कल्पना दिली असल्याचे सांगत होता. मात्र, 28 क्रमांक फाटकावरील गेटमनने मला नीरा बाजुकडून गाडी येत असल्याची कोणतीही कल्पना दिली नसल्याने फाटक बंद केले नाही, असे नीरा स्टेशन मास्तरने सांगितले. नीरा, वाल्हे व फाकट क्रमांक 28 वरील रेल्वे फोनची डिटेल्स पाहिल्यानंतर वास्तव समोर येणार आहे. ही दुर्घटना घडली असती तर अनेकांचे बळी गेले असते, यामुळे याला जबाबदार कोण? असा सवाल वाहन चालक तसेच नागरिकांतून केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.