दुसऱ्या लॉटरीतील प्रवेशाची मुदतवाढ आज संपणार

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशाच्या दुसऱ्या लॉटरीतील प्रवेशाची मुदतवाढ शनिवारी संपणार आहे. यानंतर आता प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार नाही.

विविध जिल्ह्यांतील 9 हजार 195 शाळांमध्ये एकूण 1 लाख 16 हजार 796 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी 2 लाख 45 हजार 488 ऑनलाइन अर्ज पालकांकडून दाखल झाले आहेत. “आरटीई’ प्रवेशासाठी पहिली राज्यस्तरीय लॉटरी 8 एप्रिल रोजी काढण्यात आली होती. याद्वारे 67 हजार 716 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या होत्या. मात्र, यातील 47 हजार 35 जागांवरच पालकांनी आपल्या मुलांचे प्रत्यक्षात शाळांमध्ये प्रवेश निश्‍चित केले होते. यात पहिल्या फेरीतील 20 हजार 681 प्रवेशाच्या जागा रिक्‍त राहिल्या होत्या.

प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी 15 जून रोजी दुसरी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीतून 35 हजार 276 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या लॉटरी लागलेल्या पालकांना पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 29 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 19 हजार 106 मुलांचे शाळांमध्ये प्रवेश झाले. उर्वरित प्रवेशाच्या जागा या रिक्‍तच राहिल्या होत्या. अद्यापही या दुसऱ्या फेरीतील 15 हजार प्रवेशाच्या जागा रिक्‍तच आहेत.

विविध संघटना व पालकांनी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे केली होती. त्याची दखल घेऊन मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्राथमिकचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी जाहीर केले आहे. ही शेवटची मुदतवाढ असून जे पालक शाळांमध्ये प्रवेशासाठी गेले नाहीत तसेच ज्या पालकांना अजूनही लॉटरी लागल्याचे कळले नाही अशा पालकांना “एसएमएस’ करून शाळेत प्रवेश घेण्याच्या सूचना कराव्यात, असे आदेशही टेमकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी यांना बजाविले आहेत.
रिक्‍त जागांचा आढावा घेणार

8 व 9 जुलै या दोन दिवसांत “आरटीई’ प्रवेशाच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन त्याची निश्‍चिती करण्यात येणार आहे. यानंतर प्रवेशासाठी तिसरी राज्यस्तरीय लॉटरी लवकरच काढण्याचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.