पाक व्याप्त काश्‍मीरचे अस्तित्व नेहरूंमुळेच

गृहमंत्री अमित शहा यांची टीका

मुंबई – पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर अस्तित्वात येण्यासाठी पंडीत नेहरूच ज्बाबदार आहेत. जर नेहरूंनी पाकिस्तानबरोबर युद्धबंदी जाहीर केली नसती, तर आज पाक व्याप्त काश्‍मीर अस्तित्वातच आला नसता, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. काश्‍मीरचे पूर्ण विलीनीकरण भारतात नेहरूंमुळेच झाले नाही. नेहरूंऐवजी पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा विषय हाताळायला पाहिजे होता, असेही शहा म्हणाले.

पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करण्यासाठी येथे झालेल्या सभेत बोलताना जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा केंद्राच्या निर्णयाचे जोरदार समर्थन शहा यांनी केले. 370 कलम रद्द करण्यामागे राजकारण असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जातो आहे. मात्र आम्ही या मुद्दयाकडे राजकारणाच्या दृष्टीकोनातून पहात नाही. नेहरूंनी पाकिस्तानबरोबर अकाली युद्धबंदी जाहीर केली नसती तर “पीओके’ अस्तित्वातच आले नसते, असे ते म्हणाले.

मात्र 370 कलम रद्द करण्यावरून जम्मू काश्‍मीरमध्ये असंतोष असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष्यात तशी स्थिती नाही. 370 कलम रद्द केल्यापासून काश्‍मीरमध्ये एकही गोळी झाडली गेलेली नाही. आगामी काळामध्ये दहशतवाद संपलेला असेल, असेही शहा म्हणाले.

काश्‍मिरवर राज्य करणारे तीन घराण्यांनी तेथे लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) स्थापन करण्यास परवानगी दिली नाही, असे कोणतेही नाव न घेता ते म्हणाले. ज्यांनी काश्‍मीरमध्ये भ्रष्टाचार केला आहे त्यांना आता थंडी असूनही उष्णता जाणवत आहे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली आणि जम्मू काश्‍मीरमधील 370 कलम हटविण्यास पाठिंबा आहे की नाही, ते सांगावे, अशी विचारणा शहा यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केली. देवेंद्र फडणवीस पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.