विशाल भालेराव
खडकवासला – हवेली तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हा, तालुकास्तरावरील सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधी,
गावनेते आप-आपले प्रस्थ टिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. गाव पुढाऱ्यांच्या माध्यमातून गावागावांत पॅनलची बांधणी सुरू झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांची गाव पॅनलच्या किंगमेकरकडून चाचपणी सुरू झाली आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरून उमेदवारीचे बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जिंकणार आम्हीच! हे ब्रीद घेऊन गावातील गटबाजी मात्र चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे. आधीच रद्दबातल झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत पुन्हा नव्याने तेच आरक्षण कायम राहील या आशेचा किरण ठेवून आपले नशीब आजमावत आहेत.
या सर्व घडामोडींवर लक्ष केंद्रित केले असता सर्वसामान्य जनतेला मात्र गावातील गटातटाचे राजकारण बघायला मिळत आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सद्या गावागावात सुरू असलेल्या उमेदवारांच्या हालचालींबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. गट, गणातील संभाव्य उमेदवार व राजकीय नेते एकमेकांशी संपर्क साधून सूचना देत आहेत. सर्वच गावात कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
युवावर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला दिसत आहे. प्रस्थापितांना हादरा देण्यासाठी युवा फळी तयार होत आहे. मागच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा काढण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. महाविकास आघाडीसाठी अनेक राजकीय कार्यकर्ते इच्छुक असले तरी, पुढाकार कोण घेतो याकडे सुद्धा पुढाऱ्याचे लक्ष लागले आहे.
शक्तिप्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गरज
निवडणुकीला मनुष्यबळाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज भासते. त्यामुळे किती कार्यकर्ते आहेत. भागात प्रचार यंत्रणा कशी राबवायला हवी याचा विचार उमेदवारांनी सध्या सुरू केला आहे. महिला कार्यकर्त्याही प्रचारात आवश्यक असल्याने त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. मात्र ऐन करोना काळात प्रचारात मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे.
खर्चाचा अंदाज येईना
निवडणुकीला नेमका किती खर्च येईल याचा अंदाज अद्याप येत नसल्याचे काही इच्छुकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव आणि परिसरातील सार्वजनिक मंडळे याचे समीकरणही तपासले जात आहे. या निवडणुकीला खर्च वाढेल अशी शक्यता गृहीत भरून अनेकांनी तयारी सुरू केली आहे. तर काहीजण यासाठी अन्य पर्याय स्वीकारतील अशी शक्यता आहे.