पुणे-जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल ह्या समस्यांच्या निराकरणासाठी पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यासाठी त्यांचे अधिवास टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. पक्षी, शेती आणि पर्यावरण ही एक साखळी असून, ती टीकली तर मनुष्यजीव टिकेल, पर्यावरणाची हानी कमी होईल. त्यासाठी पक्षी ज्या अन्नसाखळ्यांचे घटक आहेत, त्या निसर्गातल्या सर्व प्रकारच्या अन्नसाखळ्या अबाधित राहणे आवश्य आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या अवतीभोवती अनेक पक्षी पहतो, त्यांचा आवाज एकतो, त्यांचे कार्य कसे चालते याचे निरीक्षण करतो. आसपासच्या वनस्पती, प्राणी, तसेच निसर्गातल्या अन्य सर्व गोष्टींचे निरीक्षण करणे आणि त्याद्वारे शिकणे हा मानवी जीवनाचा स्वभावच आहे. नक्कीच काही पक्षी आपल्या घराच्या परिसरात आल्यावर आनंद होतो, तर काही पक्षी आपण उडवून लावतो. मात्र, हे सर्व पक्षी आपआपल्या परीने पर्यावरणा संरक्षणाचे काम करत असतात. पक्षी नसतील तर हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीवर परिणाम होवून मनुष्याचे जनजीवन बिघडू शकते.
त्यामुळे पक्षी हे पर्यावरणातील अविभाज्य घटक आहे. शेती आणि पर्यावरण संवर्धन यांमध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, मात्र आपल्या अजाणतेपणामुळे शेतीसाठी होणाऱ्या फायद्यापुरताच भारतातील पक्ष्यांसंबंधीचा अभ्यास मर्यादित राहिला. भारतासारख्या कृषिप्रधान देशाने परीपूर्ण अभ्यास आणि संशोधनांवर भर देण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे पक्षी आणि पार्यावरण प्रेमींकडून वारंवार सुचविले जात आहे.
तापमानवाढ रोखण्यास हातभार
शेताची नासाडी करणाऱ्या आणि अनेक आजारांना आमंत्रण देणाऱ्या उंदीर-घुशींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे शिकारी पक्षी (घुबड, पिंगळा, नारझीनक, बहिरी ससाणा इ.) करत असतात. त्यामुळे ते शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या पक्ष्यांइतकेच ते महत्त्वाचे ठरतात. मृत प्राण्यांच्या शरीराचे अवशेष जर कावळे, घारीं आणि गिधाडांसारख्या पक्ष्यांनी खाऊन नष्ट केले नाहीत, तर असे प्राणी अवशेष कुजल्यामुळे त्यातून मुक्त होणारा मिथेनसारखा वायू जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरतो. हे पक्षी त्या समस्येपासून आपली मुक्तता करतात आणि त्याद्वारे जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या कार्याला हातभार लावतात.
वनस्पतीसृष्टी वाढवितात…
तापमानवाढीच्या समस्येवर जगात वनस्पतीसृष्टी वाढवणे हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. जवळपास सर्वच प्रकारचे पक्षी निसर्ग संवर्धनाचे काम करत असतात. परागीभवनाचे तसेच अनेक वनस्पतींच्या बिया इतरत्र विखुरण्याचे महत्त्वाचे काम पक्ष्यांमार्फत होते. फुलांचा मधुरस चाखण्यासाठी फुलांवर येणारे फुलपाखरे किंवा सूर्यपक्षी हे फुलांच्या परागीकरणाचे काम करत असतात.
कीटकांचे महत्त्व
भारतीय उपखंडात जवळपास तीस हजार प्रकारचे कीटक असल्याची नोंद आढळते. या सर्व कीटकांना अन्न पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून होते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही, तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या वनस्पती जिवंत राहणार नाहीत. त्यामुळे सामान्यपणे मानवास व शेतीस हानिकारक असणाऱ्या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करून टाकतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात, त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते.