खालापूर, – आजच्या युगातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण रविवारी (दि. २) पेट्रोल पंप संचालकाच्या कृत्यातून पहायला मिळाले. ग्राहकाने एक हजार ऐवजी १० हजार गुगल पे द्वारे पाठवलेले पैसे पेट्रोल पंप संचालकाने ग्राहकाला शोधून परत केले.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील हाल गावानजदीक असणाऱ्या माऊली एटरप्राईजेस पेट्रोल पंपात बाणेर येथील आकाश नितनवरे यांनी टेम्पोमध्ये एक हजार रुपयांची सीएनजी भरली. परंतु हेच पैसे गुगल पे च्या माध्यमातून एक हजार ऐवजी १० हजार सेंड झाले. मात्र, ही बाब त्यावेळेस आकाश यांना समजून आली नाही. टेम्पो चालक पेट्रोल पंपातून निघून गेल्यानंतर ही बाब पंप संचालकाच्या निदर्शनास आली.
पंप संचालकाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत टेम्पो चालकाचा शोध घेतला. त्याला पंपात बोलावून घेऊन त्याचे जास्तीचे आलेले ९ हजार रुपये परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्यामुळे पेट्रोल पंप संचालक श्रीमंत तांदले व बबन सानप यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
आजच्या युगात वेगवेगळ्या मार्गाने व कमी मेहनतीत पैसा कुठून येतोय, याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे अनेक जण पैशाच्या हव्यासापोटी वेगवेगळ्या वाईट मार्गाला लागल्याचे पहायला मिळत असताना आजही प्रामाणिकपणा टिकून असल्याचे अनेक उदाहरणातून पहावयास मिळत आहे.
या आधीही आमच्या पेट्रोल पंपात दोन ग्राहकांचे जास्तीचे आलेले पैसे परत करण्यात आले आहेत. यामध्ये एका ग्राहकाचे ७२ हजार व दुसऱ्या ग्राहकाचे ८ हजार रुपये त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
– श्रीमंत तांदले, पेट्रोल पंप संचालक