साडीची उत्क्रांती

परिधान करायला अवघड असलातरी संपूर्ण जगात ज्या वस्त्राबद्दल अपार उत्सुकता असते आणि जे परिधान केलेली स्त्री जगाल्यात सगळ्या बायकांत वेगळी दिसते ते वस्त्र म्हणजे आपली साडी! साडीचा उगम नक्की कुठे आणि कसा झाला? आज आपण पाहतो ती साडी तशीच भारतात निर्माण झाली की दुसरीकडून कुठून आली? खरंतर साडी हे एकमेव वस्त्र असं असेल की जे अगदी प्राचीन वस्त्रांपैकी एक असूनही ते आजही आऊट डेटेड झालं नाही किंबहूना दिवसेंदिवस त्याची फॅशन वाढतच जातेय. खरंतर साडी या वस्त्र प्रकाराचा अभ्यास करताना इतक्‍या रंजक गोष्टी कळत गेल्या की त्यांचा एकमेकींशी संबंध नसला तरी मला कोलाजासारख्या त्या इथे मांडायचा मोह आवरत नाही. म्हणून चहा आणखी एक आणि शेवटचा लेख साडीवर!

खरंतर आपण इतिहास खणत जितकं मागे जाऊ तितके साडीबद्दल संदर्भ मिळत जातात. साडी हा शब्द संस्कृत शाटी म्हणजे चौकोनी आकारचं लांब वस्त्र या शब्दावरुन आला. त्याकाळी पुरुषही असे कपडे वापरत होते त्यामुळे पुरुषांच्या कपड्यांनाही शाटी म्हणत असावेत. बौद्धसाहित्यात ही शाटी हा शब्द स्त्रियांच्या कपड्यांसाठी वापर लागेला आहे.
सिंधू संस्कृतीपासून साडी अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. हडप्पा संस्कृतीतही नक्षीचे ठसे उमटवलेलं साडीसारखं कापड मिळालं आहे. तर दुसरीकडे आपल्या संस्कृतीत साडी ही ग्रीकांकडून आली असंही मानतात. पुरातन ग्रिकांच्या मूर्ती आणि चित्रं पाहिली की आपल्याला लांबच लांब वस्त्र अंगाभोवती लपेटून त्याचं एक टोक एका खांद्यावर टाकलेली वस्त्रं आपल्या साडीसारखीच वाटतात.

या साडीला इ.स.पू.2 ते 3 हजार वर्षां पूर्वीपासूनचा इतिहास आहे. रामायण-महाभारतात साडीचे उल्लेख आढळतात पण जाणकारांच्या मते साडी त्यापेक्षा जुनी असावी. सिंधू संस्कृतीच्या काळात साडी ही फक्त कमरे भोवती गुंडाळली जायची. स्त्री-पुरुष दोघेही शरीराचा वरचा भाग उघडाच सोडायचे. त्यानंतरच्या काळात स्त्रिया या शाटीचा शेवटचा भाग खांद्यावर टाकायला लागल्या असाव्यात आणि पुरुष धोतरासारखी छाटी नेसायला लागले असावेत. साडी जरी आपल्याकडे ग्रिकांकडून आली असं एकवेळ मान्य केलं तरी ती नेसायच्या वेगवेगळ्या पध्दती, मोकळेपणानं फिरता यावं तरी ही ती सारखी सांभाळायला लागू नये म्हणून आपण त्यात निऱ्या करणं, कमरेपाशी कासोटा मारुन खोचणं, असे बदल करुन आपण साडीचा लळत लोंबा सोडून तिला देखणेपणा दिला हे मात्र नक्की. तरीही आर्यनांच्या काळात, मुघलांच्या काळात आणि इंग्रजांच्या काळात साडी जशी होती तशी आज नेसली जात नाही.

शिलाईचा शोध लागल्यानंतर जगातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवले जायला लागले पण भारतात मात्र वेगवेगळ्या भागात ही साडी वेगवेगळ्या प्रकारांनी बहरत गेली. तिचे नेसायचे वेगवेगळे प्रकार निर्माण होत गेले; इतकं की भारताचा इतिहास आणि साड्यांचा इतिहास या गोष्टी एकमेकींच्या हातात हात घालून चालतात; पण साड्यांनी आणि ते परिधान करणाऱ्या स्त्रियांनी हे बदल इतक्‍या सहजतेनं अंगीकारले की त्यांची नोंद ठेवायची तसदी कुणीही घेतली नाही. याबद्दल इतिहास जवळपास मुका आहे.

ब्रिटिशांच्या काळापर्यंत ब्लाऊज घालायची पध्दत नव्हतीच. पारशी स्त्रियांचे लांब ब्लाऊज बघितल्या नंतर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या वहिनी ज्ञानदा नंदीनीदेवी यांनी ब्लाऊज घालायची प्रथा रुढ केली. त्यापूर्वी घरात असणाऱ्या बायका काहीही घालत नव्हत्या किंवा फारतर छातीवर कापडाची फक्त आडवी पट्टी गुंडाळली जायची. हे आजच्या हाय फॅशन ट्युबटॉपसारखंच होतं. नंतर ब्लाऊज व्यवस्थित शिवून त्याला बाह्या जोडल्या गेल्या. पूर्वीच्या बायका तळहाता एवढ्या फक्त पाच तुकड्यांमधे हातावरच चोळी शिवायच्या!

हातमागानंतर यंत्रमाग आणि सिंथेटिक कापड आल्यामुळे साड्यांची निर्मिती वाढली आणि किंमत कमी झाली; तरीही आज हातमागावरच्या ओरिजनल साड्या मौल्यवान मानल्या जातात. शेवटी गेल्या शंभरवर्षांचा आढावा घेतला तर भारतातल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, एम. एस. सुब्बलक्ष्मी, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा उथ्थूप, शबाना आझमी, स्मीता पाटील, मेधा पाटकर, आणि ऐश्‍वर्या राय यांनी भारतातल्या साडीला जागतिक पातळीवर खूप उंचावरच्या स्थानावर नेऊन ठेवलं यात शंकाच नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.