राज्य सरकारचा सर्वच बाबींत पळपुटेपणा

भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका

पुणे – महाविकास आघाडी सरकारचा मतदारांवर विश्वास नाही. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांनीही भाजपच्या बाजूने कौल द्यावा, असे आवाहन भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केले. या सरकारने वर्षभरात राज्याची दयनिय अवस्था केली आहे. जनतेचा विषयाबाबत बोललो तर सरकार पळपुटेपणा करत आहे, असा टोला शेलार यांनी लगावला.

 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रचार प्रमुख राजेश पांडे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीने पदवीधर शिक्षकांसाठी काहीच केले नाही, असा आरोप करत शेलार म्हणाले, “मराठा आरक्षण मागितले तर सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात. शेतकरी, करोना महामारी, वीजबील, अतिवृष्टी, महिला अत्याचार यासह जनतेच्या विषयाबाबत सरकारला विचारल्यावर ते उत्तर देत नाही किंवा दुसऱ्याकडे बोट दाखवितात. सध्या त्यांना दोनच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, त्या म्हणजे बॉलिवूड आणि पब, बार. वीजबिल थकबादीराबाबत स्पष्टीकरण देताना शेलार म्हणाले, आमचे सरकार आल्यावर 19 हजार कोटी विजबिलाची थकबाकी होती. त्यानंतर तीस हजार कोटींची थकबाकी वाढली.

 

ही थकबाकीची रक्कम 45 लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केल्याची आहे. त्यामुळे चौकशी नक्की करा, मात्र त्याअधी तुमच्या काळातील थकबाकीचा हिशोब द्या, असा प्रश्न अशिष शेलार यांनी उपस्थित केला.

 

आरोपांतही विरोधाभास

पुण्यातील करोनाची आकडेवारील लपवली जाते का? या प्रश्नावर बोलताना अशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका करत पुण्यात आकडेवारी लपवली जात असल्याचे मान्य केले. मात्र, त्याचवेळी पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे, असे बोलल्यावर शेलार यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक याबाबत बोलतील असे सांगितले. “आकडेवारी लपवली जात नसून, जास्तीत जास्त नमुने तपासणी संख्या पुण्यात होत असल्याचे मुळीक यांनी सांगितले. त्यावर “शेलार साहेब खोटे बोलतात का’ या उलट प्रश्नावर पदाधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.