पुणे – आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील स्थानके, डेपो आणि कार्यालयांची धुरा महिलांनी सांभाळली. यासह पुणे-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसची आणि पुणे स्थानकाची कमान देखील महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली.
पुणे विभागामध्ये महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देत, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दरम्यान विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी क्रु बुकिंग लॉबी आणि स्थानक परिसरातील सर्व विभागांमध्ये तैनात असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या सर्वच क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत, ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे, असे शर्मा म्हणाल्या. पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमधील महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नीलम चंद्रा यांसह विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एक्स्प्रेसचे सारथ्य
पुणे-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसचे सारथ्य रविवारी महिला लोको पायलटने केले. या एक्स्प्रेसला रेणू शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवला. या एक्स्प्रेसमध्ये लोको पायलट, गार्ड, तिकीट तपासणीस आणि सुरक्षा अधिकारी या जबाबदाऱ्या महिलांनी पार पाडल्या. श्रद्धा तांबे आणि संध्या कुमारी या सारथ्य केले. तर गार्ड म्हणून राधा चलवादी यांनी काम पाहिले.
स्थानकाचीही जबाबदारी
रोज लाखो प्रवाशांची रेलचेल असणाऱ्या पुणे स्थानकाची धुरा रविवारी महिलांच्या खांद्यावर होती. सहाय्यक वाणिज्य प्रबंधक डॉ. सीमा अरोरा यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचाऱ्यांनी गार्ड, क्रु लॉबी, तिकीट बुकिंग या महत्त्वाच्या कार्यालयांसह स्थानकाची जबाबदारी पेलली.