जीवनाचे सत्व जीवनसत्त्व- ‘अ’

केस गळणं, पाय दुखणं, हात दुखणं, दात ठिसूळ होणं, अकाली प्रौढत्व येणं, त्वचा सुरकुतणं यांसारख्या समस्या घेऊन बहुतेकांचं डॉक्‍टरांकडे जाणं होतं. तेव्हा डॉक्‍टर लिहून देतात जीवनसत्त्वांच्या गोळ्या. गोळ्यांच्या स्वरूपात जीवनसत्त्वं घेण्यापेक्षा ती नैसर्गिक स्वरूपात घेणं चांगलं. मानवी यकृतात काही खाद्यपदार्थाचं रूपांतर जीवनसत्त्व अ’मध्ये बदलण्याची क्षमता आहे. पिवळी, लाल आणि गाजरी रंगाची फळं-भाज्या यांचंही यकृत जीवनसत्त्व अ’मध्ये रूपांतरण करतं. कॅरोटीन हे द्रव्य जीवनसत्त्व अ’चा एक घटक पदार्थ आहे.

कॅरोटीन खाण्यात जास्त प्रमाणात आल्यास त्वचा पिवळी दिसू लागते. तसंच तळहाताची त्वचा आणि पायाचे तळवेही पिवळे दिसू लागतात. मात्र हे काविळीचं लक्षण नाही. अशा वेळी कॅरोटिनयुक्त पदार्थ खाणं थांबवल्यास त्वचा मूळ रंगावर येते. वयस्क माणसात मात्र जीवनसत्त्व अ’चं अतिप्रमाण पाठीत बाक निर्माण करतं. तसंच हालचाली करण्यास त्रास होऊन, शरीराच्या उजव्या बाजूच्या अवयवांत फुगवटा येऊन माणूस चालताना उजवीकडे झकून चालू लागतो. तसंच हाडं ठिसूळ होऊन मोडतात.

कमतरता आणि विकार :

डोळ्यांचं पटल कोरडे होऊन, सुकत गेल्यास रातांधळेपणा, काचबिंदू आणि दृष्टीसंबंधीचे विकार सुरू होतात. डोळे सतत कोरडे पडतात. डोळे अर्धवट बंद होऊन सुजल्यासारखे वाटतात. डोळ्यांच्या शुभ्र पटलास इजा पोहोचते. लहान मुलांची वाढ थांबते, प्रतिकारशक्‍ती घटते. सर्दी पडशाचा सतत त्रास होऊ लागतो. त्वचा रुक्ष आणि कोरडी पडून त्यावर अनेक प्रकारचे पुरळ आणि पीटिका निर्माण होतात. केसांच्या मुळांच्या कडेस सूज आल्याप्रमाणे फुगीर भाग निर्माण होतात.

हाडांची वाढ थांबते. अस्थिपेशींचं कार्य मंदावतं. गरोदर मातेच्या गर्भावर परिणाम होतो. दातांचं आवरण सदोष होतं. जखमा भरून येण्याची क्रिया मंदावते. हाडांच्या आकारात बिघाड निर्माण होतो. म्हणजे हाड वाढतं. नाकाचं हाड वाढणं, टाचेचं हाड वाढणं हे आजार अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी निर्माण होतात. ऐकण्याची शक्‍ती कमी होते. कानात फोड येण्याचे विकार होतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळी संबंधीचे विकार होतात. सायनसायटीज्‌ आणि नाकात कफ दाटणे हे विकार रोग-प्रतिकार शक्ती घटल्याने होऊ लागतात. अल्सर्स निर्माण होतात. भूक न लागणे, हगवण हे विकार होतात. मूतखडे आणि पित्तखडे होत राहतात.

अ’जीवनसत्त्वाचे स्त्रोत

फळं : पीच, संत्री, सफरचंद, ओले आणि सुके जरदाळू, किनू (टिनू), कलिंगड, चिबूड, खरबूज, टरबूज, अननस, पपनस, आलुबुखार, केळे, कन्टालूप, खजूर, बेदाणा, चेरी, पेर, पामची फळं, काळया बेरी, अंजीर, द्राक्षे, पेरू, रास्पबेरी, क्रेनबेरी, स्ट्रॉबेरी. रस, पेयं, सरबतं आणि दुधाचे विविध प्रकार : दूध, बदामाचं दूध, काजूचं दूध, नारळाचं दूध, ताकाचं पाणी, घरगुती चीज, घरचं लोणी, कोबी, गाजर, फुलकोबी, लेटयूस, कांदा, मुळा, पालक, टोमॅटो, कोलोकेसियाची कोवळी पानं.

सूप, सॅलड आणि भाज्या : गाजर आणि गाजराची पानं, बीट आणि बिटाची पानं, मुळा आणि मुळ्याची पानं, सेलरी, काळा कोलोकेसिया, हिरवा कोलोकेसिया, टर्नीप (एक प्रकारचा कंद), शेवग्याची पानं, फुलं आणि शेंगा, पालक, माठ, लेटयुस, टोमॅटो, रताळं, स्क्वॅश, घोळ, ओव्याची पानं, मक्‍याची छोटी कणसं, फरसबी, ब्रोकोली, कोबी, फुलकोबी, रताळी आणि त्याची पानं, कांदा, काकडी, बटाटा.

कोशिंबिरी : गाजर, मुळा, बीट आणि त्यांची पानं, इतर हिरवा पाला, टोमॅटो, पपई, काकडी, कांदा, सेलरी, रताळं, बटाटे, लेटयूस, पिवळा मका, लिंबू, फुलकोबी. चटण्या, सॉस व लोणची : शेवग्याची फुलं, मुळा, मेथी, रताळे, सर्व प्रकारची मिरी, आफ्रिकन पाम तेल (फिल्टर्ड, नॉन रिफाईंड), लाल पाम तेल (फिल्टर्ड, नॉन रिफाईंड), टोमॅटो, पेरू, कांदा, बटाटा, सोयाबीन. कच्चे, भाजलेले, शिजवलेले आणि उकडलेले खाण्यायोग्य पदार्थ : सुकं यीस्ट, मोड आलेले शेंगदाणे, गाजर, बीट, मुळा आणि त्यांची पानं, सेलरी, काळा व हिरवा कोलोकेसिया, शेवग्याच्या शेंगा, पालक, माठ, लोणी, चीज, हिरवे मूग, छोटी मक्‍याची कणसं, लाल भोपळा, ज्वारी, बाजरी, मसूरडाळ, मध, तांदूळ, गहू, घोळ, वाटाणा, स्ट्रिंग बीन्स.

वर दिलेल्या पदार्थातून सहा प्रकारांतून हजारो प्रकारचे पदार्थ बनवता येतील. तरीही जेवणाच्या ताटात अ’ जीवनसत्त्वाची पूर्तता करण्यासाठी काय काय वाढता येईल याचा नमुना पुढीलप्रमाणे : भात, मुगाची आमटी, ज्वारी, बाजरीच्या भाकऱ्या, गाजर-टोमॅटो सूप, मिरी, पेरूचं लोणचं अथवा चटणी, काकडी-टोमॅटो-गाजर-कांदा यांची कोशिंबीर, मोड आलेले शेंगदाणे. इतके 8 ते 10 पदार्थ पानात असल्यानंतर जेवण जेवणाऱ्याची भूक नक्कीच भागू शकेल.

– डॉ. एस. एल. शहाणे

Leave A Reply

Your email address will not be published.