वडूज – येथील न्यायालयात एका अजामीनपात्र गुन्ह्यासंदर्भात आलेल्या एका संशयिताने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरद दिनकर बुधावले (वय 24 रा. कलेढोण) असे त्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, पळून गेलेला आरोपी रात्री उशिरा घरी सापडला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शरद बुधावले यास अटक वारंट काढण्यात आले होते. त्यानुसार तो वडूज येथील न्यायालयात हजर झाला होता. यावेळी न्यायालयाने त्या आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली.
याची माहिती त्याला समजताच त्याने गर्दीचा फायदा घेत पलायन केले. दरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शरद बुधावले याने न्यायालयतून पलायन केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवली आहेत. त्याचा शोध सुरु आहे. त्याच्यावर कलम 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सांगितले.