दिवसभरात सहा गावांत 24 बाधित
लोणी काळभोर – हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, थेऊर, आळंदी म्हातोबा व सोरतापवाडी या सहा गावांच्या हद्दीत शनिवारी (दि. 8) 24 नवीन करोनाबाधित आढळले आहेत.
कदमवाकवस्ती 9, लोणी काळभोर 5, उरुळी कांचन 5, थेऊर 3, आळंदी म्हातोबाची 1 व सोरतापवाडी 1 या सहा ग्रामपंचायत हद्दीत 24 पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी, पूर्व हवेलीत मात्र करोनाचा उद्रेक पूर्वीप्रमाणे सुरूच आहे. दरम्यान, पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची व सोरतापवाडी या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीतील करोना बाधीत रुग्णांची संख्या 400 च्यावर पोहोचली आहे. तर वरील 8 ग्रामपंचायत हद्दीत सध्या शंभरहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील बारा दिवसांत 10बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लोणी काळभोर येथील आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
मागील काही दिवसांच्या तुलनेत पूर्व हवेलीत चार ते पाच दिवसांपासून करोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी, रुग्ण वाढ होतच आहे. नागरिक जोपर्यंत काळजी घेत नाहीत, तोपर्यंत करोना आटोक्यात येऊ शकणार नाही, असेही डॉ. जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.