‘ छत्रपतीं’चा पुतळा उभारणे हे अभिमानास्पद-खासदार गिरीश बापट

बाणेर येथील भूमिपूजन सोहळ्यात मान्यवरांचे गौरवोद्‌गार

औंध (प्रतिनिधी) – बाणेर गावाचा प्रवास हा स्मार्ट व्हिलेजकडून स्मार्ट सिटी, असा झालेला आहे. यामुळे बाणेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्‌गार बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभावेळी खासदार गिरीश बापट यांनी काढले.

बाणेर येथे तयार उभारण्यात येत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची माहिती प्रास्ताविक करताना प्रल्हाद सायकर यांनी दिली. पुतळा तसेच शिवचरित्र देखील साकारण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील उभारण्यात येणार असल्याचे तसेच मे महिन्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न असल्याचेही सायकर यांनी सांगितले.

बाणेर गाव येथील या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी साकारणार आहे त्या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाच किल्ल्‌यांवरील माती व तेथील पाणी अर्पण करण्यात आले. या सोहळ्यास खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश करपे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर, नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर, दिलीप मुरकुटे, ज्ञानेश्‍वर तापकीर, प्रकाश बालवडकर तसेच बाणेर गावातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजप पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिकेत मुरकुटे यांनी आभार मानले.

सर्वपक्षीय सोहळा…
औध-बाणेर पक्षातील सर्व राजकीय पक्षातील मंडळी संयोजक प्रल्हाद सायकर यांचे आमंत्रण स्विकारून सोहळ्यात एकत्र आल्याने नागरिकांनी या गोष्टीचे समाधान व्यक्त केले. तसेच, सायकर यांचे याबद्दल अभिनंदनही केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.