अमोल कोल्हेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलणार


शिरूर लोकसभा मतदारसंघ : इच्छुकांच्या तयारीवर पाणी

– श्रीकृष्ण पादिर

पुणे – सिने-नाट्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला “जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील “समीकरणे’ बदण्याची चिन्हे आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उेमदवारी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास सलग “चौथ्या’वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळेल. मात्र याआधी या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या व काही दिवसांपसून मतदारसंघ “पिंजून’ काढत निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्यांना आपल्या “स्वप्नांवर पाणी’ सोडावे लागणार आहे.

खरे तर 2014मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाच जुन्नर विधानसभेची “उमेदवारी’ त्यांना मिळणार, अशी चर्चा राजकीय धुरीणांमध्ये होती; मात्र जुन्या जाणत्यांचा अन्‌ निष्ठावंत सैनिकांचा विचार करता त्यांना उमेदवारी देणे शिवसेनेला त्यावेळी “शक्‍य’ झाले नाही. ही संधी हुकल्यानंतर जनमाणसांत प्रसिद्ध असलेल्या या अभि’नेत्याला’ नाराज करून चालणार नाही, हेही शिवसेनेने “ओळखले’. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची संधी दिली. काही कारणांनी संपर्कप्रमुख पदावरून डॉ. अमोल कोल्हे “पायउतार’ झाल्यानंतर पक्षात त्यांना बराच काळ “मोठ्या’ पदापासून दूर राहावे लागले. यावेळीही जुन्नर विधानसभेची उमेदवारी मिळणे “दुरापास्त’ आहे, याची खात्री झाल्यानंतर त्यांचा शिवसेनेशी असणारा संपर्क काहीसा “तुटक’ दिसू लागला. यातच 21 ते 26 फेब्रुवारीदरम्यान “संभाजी’ महानाट्याचे बारामतीत आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान 23 फेब्रुवारीला बारामती येथे शरद पवार यांची यांच्या “गोविंदबाग’ या निवासस्थानी मराठा सेवा संघाचे प्रवीण गायकवाड यांच्या समवेत डॉ. कोल्हेंनी भेट घेतली होती. त्यावेळी चर्चा केवळ प्रवीण गायकवाड यांचीच होती. मात्र शरद पवार यांचा “राजकीय’ अनुभव पाहता त्यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा “मोहरा’ आपल्या “गळाला’ लावून घेत बेरजेचे राजकारण सुरू ठेवले.

हा निव्वळ योगायोग नव्हे
गेल्या दिड-दोन वर्षांत काही “घडामोडी’ लक्षात घेतल्या, तर डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीशी नक्कीच “जवळीक’ वाढलेली दिसली. सध्या छोट्या पडद्यावर “स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरू असताना या मालिकेसाठी त्यांना राष्ट्रवादीचे खासदार असलेले व शिवाजीमहाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे सांगण्यात येत आहे. यातच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही त्यांच्या खासगी कार्यक्रमाला त्यावेळी शिवसेनेचे नेते असलेले डॉ. अमोल कोल्हे यांना सेलिब्रिटी म्हणून “संभाजी’च्या रुपात आणले होते. त्यांच्यासमवेत “येसुबाई’ अर्थात प्राजक्ता गायकवाड यादेखील होत्या. याला निव्वळ “योगायोग’ समजणे आताच्या घडामोडींवर लक्ष देता धाडसाचे ठरेल.

बेरजेच्या राजकारणात राष्ट्रवादी “पुढे’
या सर्व घडामोडी घडून गेल्या आहेत. आता डॉ. अमोल कोल्हेंचा व त्यांना पक्षात घेणाऱ्या राष्ट्रवादीची “चाल’ काय असेल, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. पक्षप्रवेशाची वेळ पाहता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार “फिक्‍स’ नाही. जे कोणी इच्छुक आहेत, त्यांच्यात काहींना गटबाजीचा “धोका’ आहे. उमेदवार जुळवून घेण्याचे प्रयत्न करीत असले तरी आपापल्या मतदारसंघात मातब्बर असलेले नेते त्यांना सहकार्य करतीलच असे नाही. याचा प्रत्यय 2009मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे चार आमदार तसेच 2014मध्ये पाच आमदार असतानाही आला आहे. आता डॉ. अमोल कोल्हेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीलाही नवा चेहरा मिळेल अन्‌ कोल्हे यांचीही निवडणूक लढण्याची “इच्छा’ पूर्ण होईल. नवा चेहरा असल्याने “गटबाजी’चाही प्रश्‍न येणार नाही. अडचण आहे ती केवळ इच्छुकांना “शांत’ करण्याची; मात्र ते “कसब’ शरद पवार यांच्यामध्ये नक्कीच आहे. एकंदरीत बेरजेचे राजकारण करताना 2019मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस एक “पाऊल’ पुढे टाकताना दिसत आहे.

‘शिवाजी’ विरूद्ध ‘संभाजी’ लढत
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे. तशी आढळराव यांनी तयारीही सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता डॉ. अमोल कोल्हेंचा प्रवेश झाला आहे. छोट्या पडद्यावर ते “स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत राजे “संभाजी’ यांची भूमिका साकारत असल्याने अनेकजण त्यांना संभाजी म्हणूनच ओळखतात. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. कोल्हेंना उमेदवारी दिली तर या मतदारसंघात “शिवाजी विरूद्ध संभाजी’ असे लढत होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)