करप्रणाली शिथिल होणार; कर्जपुरवठा वाढविणार ः व्यापार विभागाकडून आराखडा तयार
भांडवल उपलब्ध होईल, यंत्रणा विकसित केली जाणार; अधिकाऱ्यांचा विश्वास
पुणे – आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवे उद्योग म्हणजे स्टार्ट अप वाढण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात क्षमता आहे. या क्षमतेचा वापर करून घेण्यासाठी स्टार्ट अपसाठी आगामी काळात वातावरण अधिक सकारात्मक केले जाणार आहे.
या उद्योगांना कर भरताना अधिक मनुष्यबळ आणि वेळ लागू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा उद्योगांना भांडवल उपलब्ध होईल याची काळजी घेण्यात येणार आहे. गेली दोन वर्ष या क्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करून उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने यासाठी एक दीर्घपल्ल्याचा आराखडा तयार केलेला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या अशा कंपन्यांना ब्रॅंड विकसित न झाल्यामुळे भांडवल उभारणीसाठी देशात आणि धावपळ करावी लागते. त्यांना कर्ज रोख्यातूनही भांडवल उपलब्ध होईल अशी यंत्रणा विकसित केली जाणार आहे. त्याचबरोबर कर रचना शिथील केली जाणार असल्यामुळे या कंपन्यांना महिन्यातून केवळ एक तास कर विभागाची कामे पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकारने स्टार्ट अपसाठी 10 हजार कोटी उपलब्ध केलेले आहेत. या पैशाचा विनियोग कसा करायचा याचा आराखडा या अहवालात देण्यात आलेला आहे.
नावीन्याला चालना देणारी केंद्रे शहरात उभारणे, त्यांना लागणाऱ्या कर्जासाठी हमी देणे याचा या आराखड्यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर या उद्योगांनी विकसित केलेली उत्पादने सरकारी कामकाजासाठी उपयोगी असतील तर त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यास विभागांना सांगण्यात येणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना जागतिक पातळीवरील घडामोडीची माहिती व्हावी याकरिता या क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
24 हजार 250 स्टार्ट अपना सवलती
सध्या स्टार्ट अप्स क्षेत्रातील कंपन्यांना जीएसटीचे विवरण भरणे, इतर करांचे विवरण भरणे आणि राज्यांच्या नियमांची अंमलबजावणी करणे यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. मात्र त्यांना या विषयावर जास्त वेळ लागणार नाही अशी यंत्रणा आराखड्यात विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत विभागाने तब्बल 24,250 इतक्या स्टार्ट अपना मान्यता दिलेली आहे. या सर्व स्टार्ट अप्सना कर सवलतीचा लाभ होत आहे.