11 टक्के नव्हे 500 चौ.फुटांच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ – कॉंग्रेसच्या टिकेला भाजपाचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईतील 500 चौ.फुटांच्या घरांना फक्त 11 टक्के मालमत्ता कर माफ होणार अशी आवई उठविणाऱ्या कॉंग्रेसला आज भाजपाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2019-20 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची बिले अद्याप निघालेली नाहीत. नवीन वर्षात मालमत्ता कराची बीले तयार होतील, तेव्हा 500 चौरस फूटांच्या घरांना कोणताही मालत्ता कर लागणार नाही, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी आज स्पष्ट केले.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत आशिष शेलार बोलत होते. लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचे वातावरण तापले असतानाच मुंबईतील मालमत्ता कराच्या मुद्यावरून कॉंग्रेसने शिवसेना भाजप युतीवर टीका केली आहे. त्याकडे आशिष शेलार यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्यांनी अतिशय सविस्तरपणे त्याची माहिती दिली.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांनी मुंबईकारांमध्ये भीती पसरवू नये. 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या संदर्भात विधानसभेत जेव्हा चर्चा झाली, तेव्हा कॉंग्रेसच्या आमदारांनी विरोध का केला, याचे उत्तर मिलिंद देवरा यांनी दिले पाहिजे, असे आव्हान आशिष शेलार यांनी दिले.

केवळ अकरा टक्के मालमत्ता कर कमी झाला ही माहिती कमी अभ्यासामुळे कॉंग्रेसने दिली आहे. सर्वसाधारण कर हा मालमत्ता करातून निघणारा सर्वात मोठा कर आहे. त्यासाठी अध्यादेश काढताना सेक्‍शन ए (क)मध्ये बदल झाला आहे. यापूर्वी निघालेल्या अध्यादेशानंतर पालिकेच्या कायद्यात बदल झाला आहे. आता राज्य सरकारच्या कायद्यातील बदलाची प्रक्रीया सध्या सुरु आहे.

राज्य सरकारच्या कायद्यात बदल झाल्याशिवाय स्टेट एज्युकेशन सेस, ट्री सेस, एम्प्लॉयमेंट गॅंरेटी सेस हे तीन कर रद्द होऊच शकत नाही. हे तीन कर रद्द करण्यासाठी कायद्याची प्रक्रीया सुरु आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुळात सर्वसाधारण कर हा ज्या इमारतीला पाण्याचे कनेक्‍शन आहे अथवा नाही त्या आधारावर बदलत असतो. त्या इमारतींना पाण्याचे कनेक्‍शन आहे त्याला तो 31 टक्‍क्‍यांपर्यंतही असतो. ज्या इमारतींना पाण्याचे कनेक्‍शन नाही त्यांना तो अकरा टक्‍क्‍यांपर्यंत जातो. म्हणूनच ही फसवेगिरी नाही. त्यामुळे फक्त अकरा टक्के मालमत्ता कर कमी केला हे अज्ञानाचे प्रदर्श करण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी कॉंग्रेसला लगावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.