लांडेवाडीतून अख्खे उद्यान गायब

अस्तित्व उरले कमानी पुरते ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानाची अवस्था

उद्यान विभागाची चालढकल

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानाबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक भडकुंबे यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली असता हे काम स्थापत्य विभागाचे असल्याचे उत्तर उद्यान विभागाने दिले आहे. दैनिक प्रभातनेही उद्यान अधिक्षक डी. एन. गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, उद्यान विभाग केवळ उद्यान विकसित करते. त्याच्या देखभालीचे काम स्थापत्य विभागामार्फत केले जाते. त्यामुळे त्याबाबतची अधिक माहिती नसल्याचे उत्तर दिले.

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यानांच्या बाबतीतही “श्रीमंत’ आहे. त्यामुळेच की काय महापालिकेला जुन्या उद्यानांचा विसर पडला आहे. त्यातून उद्यानेच गायब होऊ लागली आहे. कुठे उद्यानांच्या जागेवर अतिक्रमणे झालीत. तर कुठे कचराकुंड्या साचल्या आहेत. लांडेवाडीतील भर चौकालगतचे अख्खे अण्णा भाऊ साठे उद्यान गायब झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. केवळ उद्यानाची लोखंडी मोडकळीस आलेली कमान याठिकाणी उरली आहे.

शहराचे क्षेत्रफळ 177.3 चौरस किलोमीटर आहे. एकीकडे प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर सारख्या प्रकल्पांमधून शहराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास साधण्याचा महापालिकेचा कयास असताना दुसरीकडे शहर हरीत रहावे याकडेही महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने तब्बल छोटी-मोठी 178 उद्याने विकसित केली आहेत. यामध्ये मोठ्या सार्वजनिक उद्यानांची संख्या तब्बल 132 आहे. त्यामुळे शहराला उद्याननगरी असेही संबोधले जाते. शहरात नव्याने 12 उद्याने प्रस्तावित आहेत. एकीकडे उद्यानांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे पूर्वीच्या उद्यानांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

लांडेवाडी चौकालगत महापालिकेने सुमारे वीस वर्षांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यान विकसित केले. या उद्यानालगतच महापालिकेने शिवसृष्टी विकसित केली. मात्र, उद्यानाकडे पुर्णतः दुर्लक्ष झाले. येथील आसन व्यवस्था मोडकळीस आली. झाडे गायब झाली. उद्यानाच्या जागेत तुळजा भवानी मातेचे मंदिर उभारण्यात आले. येथे पूर्वी उद्यान होते असे सांगितल्यास कोणाचाही त्यावर विश्‍वास बसत नाही. “पिंपरी-चिंचवड महापालिकेचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यान’ असे नमूद असलेली लोखंडी कमान याठिकाणी केवळ उभी आहे. याखेरीज उद्यानाचे कोणतेही अस्तित्त्व येथे जाणवत नाही. भर चौकालगतच्या उद्यानाची ही अवस्था असेल तर अंतर्गत भागातील उद्यानांची काय अवस्था असेल, असा सवाल करदाते करीत आहेत.

दरम्यान, येथील स्थानिक रहिवाशांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत या उद्यानाच्या जागेबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीलगत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान काही वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्याचा परिसरातील नागरिकांना लाभही होत होता. परंतु, हे उद्यान गायब झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक भडकुंबे, दत्तात्रय लोंढे, राजू जाधव, बाबा पाटोळे, नितीन दूनघव, बापू सरोदे, राजू वारभुवन, गोविंद खंडागळे, किरण जोगदंड आदी हे निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 99 वी जयंती साजरी होत असताना त्यांच्या नावाने लांडेवाडी चौकात महापालिकेने उभारलेले उद्यान गेली अनेक वर्षे गायब आहे. उद्यानाच्या जागेवर सध्या केवळ प्रवेशद्वाराची लोखंडी कमान अस्तित्वात आहे. त्यावरही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा एकेरी उल्लेख आहे. या ठिकाणी शिवसृष्टीच्या धर्तीवर सिमेंट कॉंक्रीटचे भव्य प्रवेशद्वार उभारावे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची कार्यसृष्टी उभारून ती नागरिकांसाठी खुली करावी.

– अशोक भडकुंबे, सामाजिक कार्यकर्ते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.