लोणावळा – संचारबंदी दरम्यान गरीब, उपाशी, हातावर पोट असलेल्या लोकांना मदत करावी, त्यांच्यासाठी काहीतरी करावे या उद्देशाने अनेक दानशूर लोक, विविध मंडळ आणि सामाजिक संस्था पुढे येत आहे. ही जरी एक चांगली भावना असली तरीही करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा दानशूर लोकांची तसेच स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची वाढती संख्या आणि त्यांचा उत्साह नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनासाठी मात्र डोकेदुखी ठरू लागला आहे.
“करोना विषाणू’चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत. करोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या ठिकाणी या रोगाचा प्रसार खूप वेगाने होतो. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी सरकारद्वारे जमावबंदी कायदा व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अतिउत्साही लोकांवर आळा बसावा यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल बंद केले आहे.
राज्यांच्या, जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या सर्व परिस्थितीत आपली पोट भरण्यासाठी परराज्यातून याठिकाणी आलेले अनेक मजूर ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत. हातावर पोट असणाऱ्या गरीब आणि रस्त्यावर राहणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या अंदाजानुसारवरील दोन्ही प्रकारातील सुमारे 800 ते 850 लोक लोणावळा शहरात आहेत. सोबतच शहराच्या आजूबाजूला डोंगरभागात कातकरी, ठाकर या आदिवासी समाजातील शेकडो लोक वस्ती करून रहात आहे. या सर्व लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले असून, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून अशा दानशूर व्यक्तींना आणि संस्थांना आवश्यक ती मदत केली जात आहे. मदतीचा दिवसेंदिवस वाढता ओघ ही जरी अत्यंत चांगली बाब असली तरीही त्याचे साइड इफेक्ट आता दोन्ही प्रशासनाला जाणवू लागले आहेत.
एकीकडे करोनाची लागण कोणालाही होऊ नये म्हणून अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासन कठोर प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडूनच पास मिळवून अन्नवाटप, बिस्किटे वाटप, पाणी वाटप, फळ वाटप या नावाखाली रस्त्यावर सर्रास बाहेर फिरणाऱ्या अतिउत्साही दानशूर आणि स्वयंसेवक नागरिकांना कसे आवरावे हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.
संचारबंदी दरम्यान अन्नधान्याची मदत घेऊन बाहेर पडणाऱ्या या लोकांना पोलीस बंदोबस्ताचा त्रास होऊ नये यासाठी पास देण्यात आले होते. मात्र असे पास देण्यात आलेल्या काही स्वयंसेवकांनी आपले हे पास सोशल मीडियावर शेअर करीत आपण कसे काम करीत आहोत. याचे एकप्रकारे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच या पासमुळे बाहेर कोणीही अडवत नाही आणि मुख्य म्हणजे पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळते हे बघून आता अनेक जण नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडे धाव घेऊन मदत करण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. असे दानशूर लोक आणि त्यांची पासची वाढती मागणी प्रशासनापुढे आता डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे यावर योग्य तो निर्णय घेत असतानाच मदतीचा आवश्यक ओघ देखील कायम राखण्याची कसरत नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे.