भारताच्या स्वदेशी बनावटीच्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ओदिशा – भारताने आज स्वदेशी बनावटीच्या “निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) केली असून या क्षेपणास्त्राचा टप्पा 1 हजार किलोमीटर पर्यंतचा आहे. ओदिशाच्या किनारपट्टीवरून आज या सब-सोनिक क्रूझ मिसाइलची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे आगामी काळात भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये मोठी वाढ होणार आहे.
सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती. 2013 साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. निर्भय क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या.
मिसाइलच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही समस्या होत्या. त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात. पाकिस्तान, चीनसह अनेक देश या क्षेपणास्त्राच्या कक्षेत येतात. “निर्भय’ काही सेकंदांत शत्रूच्या कोणत्याही प्रदेशाचे उच्चाटन करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्रामुळे भारताची सैन्य शक्ती मजबूत होणार आहे.
अमेरिकन नौदलाकडे असलेल्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या धर्तीवर निर्भयची निर्मिती करण्यात आली आहे. निर्भयच्या यशस्वी चाचणीमुळे शत्रूच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे.
दरम्यान, “निर्भय’ क्षेपणास्राची पहिली चाचणी 12 मार्च 2013 रोजी करण्यात आली. तर दुसरी चाचणी 17 ऑक्टोबर 2014 रोजी झाली. 16 ऑक्टोबर 2015 रोजी तिसरी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 21 डिसेंबर 2016 रोजी पुन्हा चाचणी घेतली. याशिवाय नोव्हेंबर 2017 मध्ये यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या सर्व चाचण्या ओडिशातील चांदीपूरमधील डीआरडीओच्या चाचणी क्षेत्रातून करण्यात आल्या आहेत.