अजित पवारांनी भूमिका जाहीर करताच बारामतीकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
बारामती – अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमधील तणावाचे वातावरण निवळले. अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर एकच वादा अजितदादांच्या घोषणांनी पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाचा परिसर दुमदुमला. 20 तासांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या राजकीय नाट्याचा शेवट गोड झाल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शिखर बॅंक घोटाळा प्रकरणाशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कसल्याही प्रकारचा संबंध नसताना त्यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. हे मनाला उद्विग्न करणारे, आपल्यामुळे शरद पवार यांची बदनामी होत असल्याची भावना माझ्या मनात आली. त्यामुळेच मी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याबाबत कोणालाही सांगितले नव्हते.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची मी माफी मागतो. असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी बोलताना ते भावूक झाले होते. दरम्यान, शरद पवार यांनी मनोमिलन केल्यानंतर अजित पवार यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आणि बारामतीतील अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला. “एकच वादा अजित दादा’ अशा घोषणा देत त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शिवला. तर भाजप सरकारमधील ज्या नेत्यांमुळे अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीनंतर सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता होती. दादा नॉट रिचेबल असल्याने हा सस्पेन्स अधिकच वाढत होता. शनिवारी (दि. 28) सकाळी अजित पवार “सिल्व्हर ओक’वर पोहोचल्यानंतर मात्र अनेकांना दिलासा मिळाला. त्या नंतर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करताना अजित पवार यांचा कंठ दाटून आला होता. आपल्या कणखर नेत्याला भावूक झालेले पाहताना अनेक कार्यकर्त्यांच्या डोळयाच्या कडाही पाणावल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळाले. तर आता अजित पवार लवकरच बारामतीत येऊन कार्यकर्त्यांशीही संवाद साधतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांचा दौरा अद्याप ठरलेला नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उत्सुकता
बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवारच असतील असे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी माध्यमाशी बोलताना जाहीर केले आहे, त्यामुळे अजित पवार बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज किती तारखेला दाखल करणार याचीच आता कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. 4 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने त्याच दिवशी ते अर्ज दाखल करणार की त्या अगोदर याबाबत जयंत पाटलांनी काही घोषित केलेले नाही. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून पवार यांनी वेळ देताच हा अर्ज दाखल होणार असल्याचे बोलले जात असले तरी अजित पवार बारामतीत आल्याशिवाय याबाबत चर्चा रंगणारच आहेत.