प्रिन्स फिलिप यांचे नुकतेच वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर “द क्राउन’ ही वेबसिरीज झळकली होती. ती ब्रिटनच्या राजघराण्यातील घडामोडींवर आधारित असल्याचा दावा केला जात होता. यात प्रिन्स फिलिपचे अंतरंग चित्रित करण्यात आले होते. पत्नीला राजमुकुट मिळाल्यानंतर लोकांचे टोमणे सहन करून प्रत्येक पावलावर आपल्या पत्नीला साथ देणारा पती फिलिप यांच्या रूपाने लोकांनी पाहिला. प्रिन्स फिलिप सार्वजनिक जीवनात नेहमी राणीच्या तीन पावले मागे चालत राहिले. परंतु खासगी जीवनात ते कुटुंबाचे खरे प्रमुख होते. तरीही अखेरपर्यंत राजकुमार हेच बिरुद ते मिरवत राहिले.
ब्रिटनच्या राजाची पत्नी किंवा राणीचा पती अशा भूमिकेत सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती म्हणजे प्रिन्स फिलिप होय. प्रिन्स फिलिप यांचे लग्न 1947 मध्ये राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्याशी झाले. एलिजाबेथ यांना 1952 मध्ये ब्रिटनची राणी बनण्याचा मान मिळाला. ब्रिटनचे राजघराणे आणि त्यांचे रिवाज अन्य राजघराण्यांच्या बरोबर उलट आहेत, हे या ठिकाणी समजून घेतले पाहिजे. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी ब्रिटनच्या राजघराण्यात महिलेकडे असते. एखादा पुरुष जर राजगादीवर विराजमान असेल, तर त्याची पत्नी क्वीन ही उपाधी लावू शकते; परंतु एखादी महिला राजगादीवर विराजमान असेल, तर तिचा पती केवळ प्रिन्स हीच उपाधी लावू शकतो.
अशीच घटना ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्ट यांच्या बाबतीत घडली होती. त्यांचे लग्न राणी व्हिक्टोरिया यांच्याशी झाले होते. परंतु लग्नानंतर 17 वर्षांनी त्यांना प्रिन्स कन्सोर्ट ही उपाधी मिळाली होती. प्रिन्स फिलिप यांचीही कहाणी प्रिन्स अल्बर्ट यांच्याप्रमाणेच आहे. त्यांच्या पत्नी एलिजाबेथ (द्वितीय) या 1952 मध्ये राणी बनल्या असल्या तरी फिलिप यांना प्रिन्स ही उपाधी 1957 मध्ये मिळाली. तत्पूर्वी ते “ड्यूक ऑफ एडिनबर्ग’ म्हणूनच ओळखले जात होते. दुसरीकडे, महिला म्हणजे राजाची पत्नी मात्र राणी ही उपाधी प्राप्त करू शकते. अर्थात राजगादीचे दावेदार असलेले प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला पार्कर यांनी मात्र आपण राणीऐवजी राजकुमारी म्हणजे प्रिन्सेस म्हणवून घेणे पसंत करू, अशी भूमिका घेतली होती.
प्रिन्स फिलिप 2017 नंतर सार्वजनिकरीत्या कुठेच दिसले नव्हते. त्यानंतर ते लोकांपासून दूरच राहिले होते. दीर्घकाळ ते आजारी होते. विंडसर पॅलेसमध्येच ते राहत असत. विंडसर पॅलेसव्यतिरिक्त त्यांचे येणेजाणे महाराणी व्हिक्टोरिया यांच्या खासगी सॅंड्रिघम इस्टेटपर्यंतच सीमित होते. गेल्या महिन्यात 28 दिवस ते छातीतील संसर्गामुळे रुग्णालयात होते आणि नंतर पुन्हा राजमहालात परतले. ग्रीस आणि डेन्मार्कचे प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी झाला. ग्रीसचे आणि डेन्मार्कचे प्रिन्स अँड्य्रूज आणि राजकुमारी एलिस यांचे ते एकुलते एक चिरंजीव होत. चार बहिणींच्या पाठीवर त्यांचा जन्म झाला. डेन्मार्कच्या शासक घराण्यातील म्हणजे ग्लूक्सबर्ग घराण्याचे सदस्य असण्याबरोबरच ते ग्रीसचे प्रथम जॉर्ज आणि डेन्मार्कचे नववे इसाई यांच्याशी आपल्या पितृवंशीय आधारावर ग्रीस आणि डेन्मार्क दोन्ही देशांचे राजकुमार होते. मार्गारिटा, थिओडोरा, सेसिली आणि सोफी या त्यांच्या चार बहिणी होत.
कोर्फूच्या जुन्या किल्ल्यात सेंट जॉर्ज चर्चमध्ये ग्रीक रूढीवादी संस्कारांत त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांचे बालपण खूप समस्यांनी व्यापलेले होते, असे सांगितले जाते. त्यांच्या मातोश्री स्किझोफ्रेनियाने आजारी होत्या. त्यामुळे त्या दीर्घकाळ मनोरुग्णालयातच राहिल्या. ग्रीक आणि डॅनिश शाही कुटुंबात जन्म झाला असला, तरी फिलिप लहान असतानाच त्यांच्या कुटुंबाला देशातून निर्वासित करण्यात आले. फिलिप यांचे शिक्षण फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये झाले. त्यानंतर 1939 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांनी 13 वर्षांच्या राजकुमारी एलिजाबेथ यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. 1934 मध्ये त्या दोघांची पहिली भेट एका समारंभात झाली होती.
दुसऱ्या महायुद्धानंतर फिलिप यांना सहावे जॉर्ज यांनी एलिजाबेथ यांच्याशी लग्न करण्याची अनुमती दिली. त्यांच्या वाङ्न्÷िन्÷नश्चयाची अधिकृत घोषणा 1947 मध्ये करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या ग्रीक आणि डॅनिश उपाध्यांचा त्याग केला आणि ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारून त्यांचे आजोबा (आईचे वडील) यांचे “माउंटबॅटन’ हे उपनाम स्वीकारले. 20 नोव्हेंबर 1947 रोजी एलिजाबेथ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या लग्नाची जगभरात चर्चा झाली. असे सांगतात की, लग्नाच्या काही वेळ आधी सहावे जॉर्ज यांच्याकडून फिलिप यांना “हिज रॉयल हायनेस’ आणि “ड्यूक ऑफ एडिनबर्ग’ या उपाध्या मिळाल्या. त्यानंतर राजघराण्यातील ही नवी जोडगोळी नेहमी चर्चेत राहिली. 1952 मध्ये सहावे जॉर्ज यांनी एलिजाबेथ यांना राणीचा मुकुट बहाल केला, तोपर्यंत फिलिप सैन्यात सेवा बजावत राहिले. ते कमांडर पदापर्यंत पोहोचले होते. 1957 मध्ये त्यांना प्रिन्स हा किताब मिळाला.
प्रिन्स फिलिप आणि राणी एलिजाबेथ यांना चार अपत्ये आहेत. “द क्राउन’मधील चित्रण खरे मानल्यास त्या दोघांचेही त्यांच्या मुलांशी असलेले संबंध मैत्रीपूर्ण राहिले. प्रिन्स फिलिप यांची प्रतिमा एक आनंदी वृत्तीचा जबाबदार पिता आणि पती म्हणून रंगविली आहे. अशा परिस्थितीतूनसुद्धा त्यांनी हसत हसत मार्ग काढला. अनेक अडथळे येऊनसुद्धा प्रिन्स फिलिप आणि क्वीन एलिजाबेथ यांनी सात दशके शाही कुटुंबाचा गाडा हाकला. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा राजे जॉर्ज हयात होते. त्यामुळे एलिजाबेथ यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत राजेशाही जीवनाशी त्यांचा अधिक संबंध नव्हता. प्रिन्स फिलिप हे बकिंगहम पॅलेसच्या नियमावलीमुळे नाराज असत. परंतु पाच वर्षांत सर्वकाही बदलून गेले.
1952 मध्ये किंग जॉर्ज यांचे निधन झाले. त्यांची सर्वांत मोठी कन्या असल्यामुळे एलिजाबेथ यांना राणीपद प्राप्त झाले. त्यानंतर सर्वच वातावरण बदलू लागले. ब्रिटनसह संपूर्ण जगाच्या नजरा 25 वर्षांच्या राणी एलिजाबेथवर होत्या. जगातील सर्वांत मोठ्या राजघराण्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी या तरुण राणीवर होती. कॉमनवेल्थ देशांबरोबर चालण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर होते. त्याचबरोबर स्वतःचे वैवाहिक जीवनही सांभाळायचे होते. या दोघांचे पहिले अपत्य म्हणजे प्रिन्स चार्ल्स. त्याचा जन्म झाला, त्यावेळी त्याला आपल्या वंशाचे नाव देण्याची इच्छा फिलिप यांना होती. “माउंटबॅटन’ हे आडनाव त्याला द्यावेसे त्यांना वाटत होते. परंतु बरेच प्रयत्न करूनसुद्धा ते शक्य झाले नाही. राणी एलिजाबेथ यांनी 1952 मध्येच आदेश जारी केला आणि आपल्या मुलांचे आडनाव “विंडसर’ हेच राहील, असे जाहीर केले. त्यानंतर फिलिप यांनी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, संपूर्ण ब्रिटनमध्ये ते एकमेव असे पिता आहेत, जे आपल्या मुलांना आपले नाव देऊ शकत नाहीत. बऱ्याच वर्षांनी आता नियमात बदल झाला आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या मुलाचे नाव आर्ची माउंटबॅटन-विंडसर असे ठेवण्यात आले आहे.
प्रिन्स किंवा राजकुमार हा किताब मिरविणे ब्रिटनमध्ये आव्हानात्मक असते. कारण ब्रिटनमध्ये राणीच्या पतीची कोणतीही अधिकृत भूमिका असत नाही. प्रिन्स फिलिप यांचे जीवन अनेकदा वादग्रस्तही ठरले होते. त्यांचे सार्वजनिक जीवन आणि खासगी जीवन यात बरेच अंतर होते. अखेरपर्यंत राजकुमार हेच बिरुद मिरविणारे फिलिप यांनी 99 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि एका प्रदीर्घ कहाणीचा अंत झाला.
– विनिता शाह