काश्‍मीरमध्ये 2019 मध्ये 101 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – काश्‍मीरमध्ये 2019 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यांमध्ये तब्बल 101 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र याच काळात 50 नवीन दहशतवाद्यांची भरतीही झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हे दहशतवादी मार्चपासून वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. यांच्या सारख्या नवीन सदस्यांना रोखण्यासाठी अधिक चांगल्या उपाय योजनांची गरज आहे. त्यासाठी कट्टरवादी गटांमध्ये सामील होणाऱ्या युवकांच्या पालकांचेच प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जानेवारी महिन्यापासून ज्या 101 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, त्यामध्ये 23 विदेशी आणि 78 स्थानिक दहशतवादी आहेत. त्यांच्यामध्ये झकीर मुसासारख्या दहशतवादी कमांडरचाही समावेश आहे. झकीर मुसा हा अल कायदाशी संबंधित अन्सार गझवत उल हिंद या गटाचा कमांडर होता. मात्र 23 मे रोजी मुसा मारला गेल्यानंतर हिज्बुल मुजाहिदीनमध्ये भरती होणाऱ्या युवकांची संख्या अचानक वाढली आहे. त्यात दक्षिण काश्‍मीरमधील युवकांचेच प्रमाण अधिक आहे. पूंछ आणि राजौरी जिल्ह्याबरोबर जम्मू भागात एलओसी जवळून घुसखोरी करणाऱ्या काही जणांना सुरक्षा रक्षकांनी पकडले आहे.

शोपियनमध्ये सर्वाधिक 25 तर पुलवामामध्ये 15 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापाठोपाठ अवंतिपोरामध्ये 14 आणि कुलगाममध्ये 12 दहशतवादी मारले गेले आहेत. अनेक जणांना हिंसाचाराच्या मार्गाचा फेरविचार करावा असे वाटू लागले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.