सातारा -कास पठार परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय होईल. अभ्यासपूर्ण अहवाल आणि नोंदी घेऊनच योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
कास पठारावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या संदर्भाने जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी गुरुवारी कास पठाराचा अचानक दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक रिसॉर्टच्या जागांची पाहणी करून त्याच्या महत्त्वपूर्ण नोंदी घेतल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक दौऱ्याने जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.
सातारा ते कास रस्त्यावरील सुमारे 93 रिसॉर्ट आणि 31 बंगल्यांना साताऱ्याच्या तत्कालीन तहसीलदार आशा होळकर यांनी 52- 53 च्या अंतिम नोटिसा बजावल्या होत्या. या हॉटेल आणि मिळकतधारकांनी आपली अतिक्रमणे सात दिवसांच्या आत काढून घ्यावीत, असे नोटिसीत बजावण्यात आले होते. हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या काही सदस्यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि ही बांधकामे
वस्तुस्थितीपूर्ण अहवालाच्या माध्यमातून नियमित करण्यासंदर्भात हालचाली व्हाव्यात, अशी विनंती करण्यात आली. हॉटेल व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असताना जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी मात्र कास पठाराच्या पाहणीसाठी दौऱ्यावर गेले होते. याला दै. प्रभातशी बोलताना खुद्द जयवंशी यांनीच दुजोरा दिला.
ते म्हणाले, “कास पठार जागतिक दर्जाचे पठार असून येथील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात किंवा त्याची माहिती घेताना प्रत्यक्षात कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय होईल. कास पठारावरील अतिक्रमणे हा तसा जुना विषय आहे. यासंदर्भात निश्चित काय करावे लागेल याचा अभ्यासपूर्ण अहवाल आणि नोंदी घेऊनच पुढील योग्य कार्यवाही करण्यात येईल.’ आवश्यकता वाटल्यास संबंधित रिसॉर्ट चालक व प्रशासन यांची पुढील आठवड्यात बैठकही घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अचानक दौऱ्याचा “दे धक्का’
जिल्हाधिकाऱ्यांनी कास पठाराचा दौरा केल्याने प्रशासनाने कासवरील अतिक्रमण समस्येत सक्रिय लक्ष घातल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी असा अचानक दौरा केला नव्हता. मात्र, रुचेश जयवंशी यांचा अचानक दौऱ्याचा “दे धक्का’ अनेक बड्या धेंडांच्या पचनी पडलेला नाही.