काबूल – अफगाणिस्तानमध्ये इतर देशांनी बंद केलेले आपले दूतावास या वर्षाच्या अखेरपर्यंत पुन्हा सुरू करावेत, अशी अपेक्षा तालिबानने व्यक्त केली आहे. तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद नईम याने इतर देशांना हे आवाहन करताना कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. बहुतेक देशांनी ऑगस्ट महिन्यापासून काबूलमधील आपले दूतावास बंद केलेले आहेत.
केवळ तुर्की, चीन आणि पाकिस्तानी दूतावासाचे कामकाज सुरू असल्याचे समजले होते. आता सौदी अरेबियाने आपला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य देशांकडून अद्याप तशी कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही.
अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेतल्यावर तीन महिने होऊन गेल्यावर आता आपल्या सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आठवड्याच्या प्रारंभी अमेरिकेचे अफगाणिस्तानसाठीचे विशेष प्रतिनिधी थॉमस वेस्ट यांनी दोहा येथे तालिबानच्या वरिष्ठ प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली होती. अफगाणिस्तानमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत वेस्ट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती.
दुसरीकडे अफगाणिस्तानचा गोठवलेला निधी खुला करण्याची मागणी तालिबानी प्रतिनिधींनी अमेरिकेकडे केली होती. सरकारच्या व्यवहारांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले होते.