“वर्क फ्रॉम होम’साठी ऊर्जामंत्र्यांचे निर्देश
पुणे – करोनामुळे राज्य शासनाने खाजगी क्षेत्रातील कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांवर काम करणाऱ्यांना घरूनच ऑनलाइन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.
राज्यात पुणे व मुंबई येथे लाखोंच्या संख्येने माहिती व तंत्रज्ञान, शासकीय व खाजगी कार्यालये, शिक्षण व संशोधन संस्था व इतर व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना कार्यालयात जाण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागतो. यासाठी बस व रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करून प्रवास करावा लागत असल्याने त्यांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने खबरदारीच्या दृष्टीने व्यवस्थापनाने त्यांना “वर्क फ्रॉम होम’ च्या सूचना दिल्या आहेत.
त्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी दि. 31 मार्चपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ही कामे एप्रिलमध्ये करावीत. अपरिहार्य कारणामुळेच देखभाल व दुरुस्तीची कामे करावी लागत असल्यास कमीत कमी वेळात पूर्ण करावीत, असे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले आहेत.