विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यास अडचणी : “व्हर्च्युअल क्लासरूम’द्वारे मार्गदर्शन करता येईना
पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (विद्या प्राधिकरण) व्हर्च्युअल क्लासरूम स्टुडिओच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील शाळांमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी शाळांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
समग्र शिक्षा, एमएससीआयटी, व्हॅर्ल्युएबल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्राधिकरणात ऑगस्टमध्ये व्हर्चुअल क्लासरूम स्टुडिओ उभारण्यात आला होता. तत्कालिन शालेय शिक्षण मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांच्या उद्घाटनही करण्यात आले होते. नंदूरबार, गडचिरोली, नाशिक, पालघर या चार आदिवासी जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास विभागातील प्रत्येकी 9 याप्रमाणे एकूण 36 निवडक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या संकल्पना स्पष्ट करून सांगण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एकाच वेळी व्हावे असे नियोजन करत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. व्ही-सॅटवर आधारित स्टुडिओ उभारण्यात आलेला आहे.
स्टुडिओसाठी तीन तांत्रिक कर्मचारी, दोन विषय साधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपसचांलकांचे यावर नियंत्रण असते. संबंधित शाळांवर प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे एकेक युनिट बसविण्यात आले आहे. स्टुडिओतून दररोज प्रत्येक विषयांचा एक तास या प्रमाणे शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत. 22 शिक्षकांची टीमही यासाठी तयार करण्यात आलेली आहे. काही शाळांमध्येत सततच अडचणी येत असल्यास जवळपासच्या युनिट बसवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संपर्क साधण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
लॉगिनबाबत शाळांना सूचना
नंदूरबार येथील बार्डी, भांगरपाणी या ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे या शाळांकडून लॉगिन होण्याचे प्रमाण 50 टक्के एवढेच आहे. इतर शाळांचेही लॉगिन करण्याचे प्रमाण 70 टक्केपर्यंतच आहे. शाळांकडून 100 टक्के लॉगिन व्हावे, असा सूचना शाळांना देण्यात आलेल्या आहेत.