निवडणुकीचे रान लागले तापायला

प्रचाराचा वेगही वाढला: पैजा लागायला सुरूवात

सातारा  – मतदानाची तारीख जसजशी जवळ यायला लागली आहे तस तसे लोकसभा निवडणुकीचे रान तापायला लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे तर नागरिक अन कार्यकर्त्यांमध्ये देखील पैजा लागायला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे.

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. साहजिकच प्रचारासाठी केवळ 16 दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. मतदारसंघाची रचना पाहता उमेदवारांना एवढ्या कमी अवधीत मतदारसंघ पिंजून काढावा लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर होताना दिसून येत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून उमेदवारांना प्रत्येक गावात आपला जाहीरनामा पोहचविता येत आहे. मात्र, मोठ्या लोकसंख्येची गावांमध्ये उमेदवाराला पोहचावे लागत आहे. सातारा मतदारसंघाची रचना पाहिली तर एका टोकाला कोयना, दुसऱ्या बाजूला पुसेगाव, तिसऱ्या टोकाला शिरवळ तर चौथ्या बाजूला प्रतापगड पर्यंत परिसर आहे.

एवढ्या मोठ्या मतदारसंघात उमेदवारांना प्रचार करावा लागत आहे. त्याच प्रचाराची वेळ आयोगाने ठरवून दिलेली आहे. मात्र, रात्री अपरात्री देखील बैठकांचा जोर सुरू असल्याची देखील माहिती समोर येत आहे. प्रचारासाठी तयार करण्यात आलेली वाहनांची संख्या देखील लक्षणीय आहे. मात्र, आयोगाच्या नियमानुसार प्रचाराचे वाहन प्रमाणित करून घ्यावे लागत आहे. ते करून घेताना कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला उमेदवार खासदार झाला पाहिजे, अशी भावना निर्माण झाली असल्याचे दिसून येते. त्यासाठी कार्यकर्ते देखील रात्रंदिवस पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. एवढेच काय तर निवडणूक जशी जवळ येत आहे. तसा गावच्या पारांवर अन शहरातील गल्ली बोळात गप्पांचा फड रंगताना दिसून येत आहे. त्यामध्ये कोणता उमेदवार निवडून येणार तसेच किती मताधिक्‍क्‍याने येणार अशा विषयांवर पैजा लागायला सुरूवात झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.