कोपरगाव – गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासकीय राज असलेल्या जिल्ह्यातील 9 नगरपालिका व एक नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात कोपरगाव, राहाता, देवळाली प्रवरा, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या नगरपालिकासह नेवासा नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोपरगाव नगरपालिका ही ‘ब’ वर्ग नगरपालिका असल्याने या पालिकेच्या सभागृहात सध्या 30 नगरसेवकांना निवडणूक द्यावयाचे आहे. 15 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन उमेदवार निवडायचे आहेत. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आज बजावलेल्या आदेशानुसार 5 जुलै रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून 20 जुलै रोजी राज्यातील 17 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करावे लागणार असून त्यासाठी 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून 28 जुलै दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम कालावधीही वरील प्रमाणे असून अंतिम दिवशी 3 वाजेपर्यंत ते दाखल करता येतील.
29 जुलै रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी होईल व 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल. 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रीया पार पडेल व 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे या सर्व जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कार्यक्रमात परिस्थितीनुरुप बदल करण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार आहे.
-जिल्ह्यातील पालिका
कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर या ब वर्ग नगरपरिषदा व जामखेड, शेवगाव, देवळाली, पाथर्डी, राहाता व राहुरी या क वर्ग नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत यांचा या निवडणुकीत कार्यक्रमात सामावेश आहे.
-अंदाज खरा ठरला
ऑगस्ट महिन्यात नगरपरिषदांच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज दै.प्रभातने एक आठवड्यापुर्वीच वर्तवला होता तो आज खरा ठरला.