बारामती, – देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी १ लाख २७५ एवढे मताधिक्य मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला. अजित पवार यांना एकूण १ लाख ७९ हजार ७८९ मते मिळाली तर युगेंद्र पवार यांना ७९ हजार ५१४ मते मिळाली.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग सातवेळा प्रतिनिधित्व केलेल्या अजित पवार यांना यंदाच्या निवडणुकीत बारामतीत मताधिक्य मिळणार का? मिळाले तर ते किती असेल, याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू होती. प्रत्यक्ष निकालादिवशी अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पोस्टल मतदानाची मोजणी झाली. अगदी सुरुवातीला अजित पवार आघाडीवर राहिले.
त्यानंतर युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली. साडेआठच्या सुमारास ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर अजित पवार यांनी आघाडी घेतली. त्यानंतर कमी अधिक फरकाने अजित पवार यांनी आघाडी टिकवली. शेवटच्या विसाव्या फेरीनंतर अजित पवार यांनी १ लाख २७५ एवढे मताधिक्य मिळवत युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव केला. पोस्टल मतमोजणीनंतर अजित पवारांचे प्रत्येक फेरीला मताधिक्य वाढत गेले. तिसऱ्या फेरीत अजित पवार यांना २७ हजार १४५ मते मिळाली. युगेंद्र पवार यांना १५ हजार ८३७ मते मिळाली. तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार यांनी ११ हजार ३०८ एवढे मताधिक्य घेतले. त्यानंतर प्रत्येक फेरीला मताधिक्य वाढत गेले.
दहाव्या फेरीअखेर अजित पवार यांनी ९१ हजार २२८ मते घेतली तर युगेंद्र पवार यांनी ४१ हजार ७६८ मते मिळवली. दहाव्या फेरीतच अजित पवार यांनी ४९ हजार ४६० एवढे मताधिक्य मिळवले होते. पंधराव्या फेरीअखेर अजित पवार यांनी लाखाचा आकडा ओलांडत १ लाख ३८ हजार ९०२ मते मिळवली. त्या फेरीपर्यंत युगेंद्र पवार यांनी ६१ हजार ९९३ मतदान घेतले. अजित पवार यांचे मताधिक्य वाढतच राहिले. पंधराव्या फेरीअखेर ते ७६ हजार ९०९ इतके झाले. शेवटच्या विसाव्या फेरीत अजित पवार यांचे मताधिक्य १ लाख २७५ वर पोहोचले. अजित पवार यांचा दणदणीत विजय झाला.
सूक्ष्म नियोजन कामी आले
२०१९ च्या तुलनेत अजित पवार यांचे मताधिक्य घटले असले तरी देखील यंदाची निवडणूक पवार विरुद्ध पवार असल्याने चुरशीची होती. खरंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच ही लढाई मानली जाते. यात काका अजित पवार यांनी पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला. शरद पवार व अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची तसेच अस्तित्वाची ही लढाई मानली जात होती. अजित पवार यांनी सूक्ष्म नियोजन करीत बाजी मारली. आपापसातील मतभेद बाजूला सारत कार्यकर्त्यांच्या समन्वय घडवून आणला. शहर व तालुक्यातील बूथ पुनर्बांधणी केली. त्या माध्यमातून ११ हजार युवक जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष निवडणुकीदिवशी उत्तम काम झाले. त्यांचा विजयात महत्त्वाचा वाटा आहे. बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक फिरल्याचे दिसून आले.