नगर – जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्र ( जिल्हा परिषद), मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र (मनपा) आणि लहान नागरी निर्वाचन (नगरपालिका) क्षेत्रातील 5 सदस्य पदे रिक्त आहेत. या पाच रिक्त सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीची अधिसूचना (सोमवार) 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे हे या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
जिल्हा नियोजनाच्या रिक्त सदस्य पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांच्या नियंत्रणात पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सादर करावे लागणार आहेत. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, अजय मोरे व शाहूराज मोरे यांच्याकडे सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून निवडणुकीकरिता जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निकाल घोषित करणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल मुदत-2 ते 5 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 जिल्हाधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी यांचे दालन. नामनिर्देशनपत्रांची छाननी- शुक्रवार (दि.6) सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत,वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिध्द -शनिवार (दि.7) उमेदवारी मागे घेण्याची तारीख-सोमवार (दि.16) आवश्यकता असल्यास मतदान घेण्यात येईल तो दिनांक, वेळ – मंगळवार (दि.24) सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतमोजणीचे ठिकाण- महासैनिक लॉन मंगल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ. मतमोजणीचा दिनांक,वेळ व ठिकाण-गुरुवार दि. 26 सकाळी 9 वाजेपासून, महासैनिक लॉन मंगल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालया जवळ.