संपले इलेक्‍शन…आता जपा रिलेशन

निवडणुकीदरम्यान आलेले कटूत्त्व विसरण्याचा प्रयत्न

पुणे – सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे आता मतदान झाल्यानंतर शांत झाले असून कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या गटातून प्रचार सुरू असताना तर कित्येक ठिकाणी राजकारणामुळे भावकी, नातेवाईक व मित्रमंडळी दुरावली गेली होती; परंतु निवडणुकीचे मतदान संपताच रात्रीपासून “संपले इलेक्‍शन, जपा रिलेशन’ यांसह आदी पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, तर कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो; परंतु सध्याचे राजकारण काही वेगळ्याच वळणावर गेलेले आहे. निवडणुका दोन दिवसांपुरत्या असतानासुद्धा अनेक ठिकाणी काही नात्यांमध्ये व मैत्रीमध्ये कायमचा दुरावा निर्माण होत असतो.

असंख्य ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी वेगवेगळ्या व्यवसायातून तसेच वेगवेगळ्या कारणातून एकत्र आलेल्या असतात. निवडणुकांपुरते एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून निवडणुका संपल्यावर सर्व काही विसरून सर्व नेते मंडळी एकत्र येत असतात; परंतु नेत्यांचे कार्यकर्ते हे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेपासून एकमेकांना मोठा विरोध दाखवून गावांमध्ये मोठे वेगवेगळे गट निर्माण करतात. ते गट पुढील निवडणुकांपर्यंत तसेच राहत असतात. यामध्ये सर्वांना नात्यांचा देखील विसर पडलेला असतो.

ही निवडणूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय होत असताना निवडणुकांचे मतदान संपताच संपले इलेक्‍शन, जपा रिलेशन या आशयाने अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.