सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील एक हजार 348 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षारंभी 1 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने सहकार सम्राटांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, प्राथमिक शिक्षक बॅंक, रयत सेवक बॅंक, कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बॅंक, कृष्णा सहकारी साखर कारखाना आदी संस्थांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात असून आगामी वर्ष राजकीय धामधुमीचे असेल.
जिल्ह्यातील एक हजार 348 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या तीन महिन्यांत जाहीर होण्याचे संकेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिले आहेत. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. मतदारयाद्या, त्यावरील हरकती, सुनावणी आणि नंतर निवडणुका, असा कार्यक्रम असेल. करोना संक्रमणामुळे सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ मिळाली होती. ही मुदतही 31 डिसेंबरला संपत आहे.
राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या जिल्हा बॅंक, शिक्षक बॅंक, कृष्णा कारखाना, रयत सेवक बॅंक, सैनिक बॅंक, बाजार समित्या यांच्या निवडणुकांसाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील मोठ्या पतसंस्थांच्या सभासदांना नवीन संचालक मंडळ निवडावे लागणार आहे.
करोनाच्या निमित्ताने जुन्या संचालकांना तब्बल तीन वेळा मुदतवाढ मिळाली असून तत्कालीन ठरावांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जुन्या ठरावांना हिरवा कंदील दाखवल्याने हा प्रश्न मिटला आहे. जिल्हा बॅकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होऊ शकतो. जुन्या ठरावांना होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता नव्या ठरावांचे प्रयोजन करावे लागेल.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे लक्ष
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर राष्ट्रवादीची पकड आहे. मूळचे राष्ट्रवादीचे, पण सध्या भाजपमध्ये असलेले आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चेअरमन आहेत. बॅंकेच्या 21 संचालकांच्या निवडीतील राजकारणावर पुढील गणिते अवलंबून असतील.
त्यामुळे या बॅंकेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष असेल. सातारा व सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूकही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. कारखान्याचे तब्बल पन्नास हजार सभासद आहेत. सध्या कारखान्यावर डॉ. सुरेश भोसले गटाची सत्ता आहे. सहकार क्षेत्रातील मातब्बर संस्थांच्या निवडणुकांमुळे आगामी वर्षात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.