बारामती – बारामती शहरातील अशोक नगर येथील सदनिका (फ्लॅट) भाडेकरू ने मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर ज्येष्ठ दाम्पत्याने शहर पोलीस स्टेशनकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली. कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळवून देण्याची लेखी हमी दिली. त्यामुळे आता काही महिन्यात सदर सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळणार आहे.
या कामी उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौंजदार संदीपान माळी, पोलीस हवालदार अनिल सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेंडगे यांनी सहकार्य केले.
शहरातील म.ए.सो विद्यालय या ठिकाणी उपमुख्यध्यापक म्हणून काम केलेले श्रीकांत प्रभुणे व त्यांच्या पत्नी उषा प्रभूने यांच्या मालकीची सदनिका अशोक नगर येथे आहे. या सदनिकामध्ये भाडे तत्वावर शिक्षक दाम्पत्य मुलासहित राहत आहे. प्रभूने पती पत्नीचे निधन झाल्यावर कायदेशीररित्या न्यायालयीन आदेशानुसार वारस म्हणून श्रीकांत प्रभूने यांचे बंधू संजय गजानन प्रभूने सासवड यांच्या नावावर सदर सदनिका झाली आहे.
परंतु शिक्षक दाम्पत्य सदनिकाचे भाडे देत नव्हते, विकत घ्या म्हटले तर विकत घेत नव्हते, सदनिका सोडून जावा म्हटले तर सोडून जात नव्हते. त्यामुळे संजय प्रभूने यांनी अनेकांना मध्यस्थी करण्यास सांगितले, समाज्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी विकत घ्या म्हणून सांगितले, पोस्टाच्या माध्यमातून दोनदा नोटीस दिली. परंतु शिक्षक दाम्पत्य सदनिका सोडण्यास किंवा ताबा देण्यास तयार नव्हते व प्रभूने यांना कोणत्याच प्रकारे दाद देत नव्हते.
अखेर वैतागलेल्या प्रभूने दाम्पत्याने पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांची भेट घेऊन सर्व कहाणी सांगितली, कागतपत्रे दाखवली. सर्व पुरावे व परिस्थिती पाहिल्यावर त्या शिक्षक दाम्पत्यास पोलीस स्टेशनला बोलावून खाकी भाषेमध्ये कायद्यानुसार कारवाई होऊ शकते हे समजवून सांगितल्यावर सदर दाम्पत्याने सदर सदनिका सोडून जाण्याची व लवकरच सदनिकेचा ताबा प्रभूने दाम्पत्यास देणार असल्याची लेखी हमी दिली.
यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यास शहर पोलीस स्टेशन च्या वतीने न्याय मिळाल्याचे समाधान वाटल्याने सदर दाम्पत्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे आभार मानून सन्मान केला.
ज्येष्ठ नागरिकांची अनेक ठिकाणी विविध माध्यमातून फसवणूक होत असते. ज्येष्ठ नागरिकांनी न भिता तक्रारीसाठी पुढे यावे. त्यांना सहकार्य करण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशन कटिबद्ध असल्याचे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.