हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरण : विशेष टीम स्थापन, ‘या’ मराठी अधिकाऱ्याकडे नेतृत्व

हैद्राबाद – तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींचा ६ डिसेंबरला पहाटे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणाच्या तपासासाठी तेलंगणा सरकारने विशेष पथकाची (एसआयटी) नेमणूक केली आहे. ८ सदस्यांच्या या पथकाचे नेतृत्व मराठमोळे पोलीस अधिकारी महेश भागवत यांच्यावर सोपवण्यात आले आहे. भागवत हे रचाकोंडाच्या पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. भागवत यांच्या नेतृत्वात हे पथक सायबराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

महेश भागवत यांनी रच्चाकोंडा या नवीन आयुक्तालयाचा २०१६ मध्ये ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी she teams च्या प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात केली. मुली, महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून त्यांनी उल्लेखनीय उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यमातून महिला सुरक्षेसाठी त्यांचे पोलीस पथक काम करते. महेश भागवत यांचे मानव तस्करी विरोधातही मोठे कार्य आहे. तसेच त्यांनी बाल मजुरीविरोधातही कारवाया करत अनेक बाल कामगारांची सुटका केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या नेतृत्वात एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी होणार आहे.

आज तेलंगाणा उच्च न्यायालयात या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान, एन्काऊंटरनंतर ४ ही आरोपींचे मृतदेह तेलंगाणा उच्च न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी होईपर्यंत हे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) पथकाने बलात्कार झालेले ठिकाण आणि एन्काऊंटर झालेल्या स्थळाचीही शनिवारी पाहणी केली. तर तेलंगाना पोलिसांनी त्या चारही आरोपींविरोधात चौकशी करताना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआईटीचे सदस्य या प्रकरणाशी संबंधीत साक्षीदारांच्या साक्ष घेतील. तसेच एन्काऊंटरमध्ये सहभागी पोलिसांचीही चौकशीही करेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.