‘विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा’

आशिष शेलारांची ठाकरे पिता-पुत्रावर टीका

मुंबई – आरेमधून कारशेडची जागा कांजूरमार्गला हलविल्यानंतर येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीनंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, मेट्रोला गिरगावात विरोध केला मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच! आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जात आहे.

मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक, अशी टीका शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर कारशेड कांजूरमार्गला उभारण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली. तसेच हे प्रकरण न्यायालयात गेले. यानंतर न्यायालयाने कांजूर येथील कामाला नुकतीच स्थगिती दिली आहे.

त्यामुळे आता मेट्रो कारशेडसाठी बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍समधील जागेचा विचार होतो आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते आहे. न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला वेळ लागू शकतो. तोपर्यंत कारशेड उभारण्यास विलंब लागू नये म्हणून ठाकरे सरकारकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरु आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.