वरिष्ठांचे प्रयत्न निष्फळ; निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू

कराड – विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांनी दाखल केलेले अर्ज काढून घेण्यासाठी शेवटच्या दिवशी आज बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्याने वरिष्ठांचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे उघड झाले. त्यामुळे कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघांत आता तिरंगी लढती होणार आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया 27 सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर चार ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कराड दक्षिणमध्ये कॉंग्रेसकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी तर भाजपकडून अतुल भोसले यांनी अर्ज दाखले केले.

चाळीस वर्षे राजकारण करणारे माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांचे पुत्र उदय पाटील यांना या निवडणुकीत कोणत्याही अधिकृत पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी रयत संघटनेतर्फे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार बाळासाहेब पाटील व ऐनवेळी पक्षबदल करुन शिवसेनेच्या वळचणीला गेलेल्या धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मात्र, याठिकाणी भाजपचे नेते मनोज घोरपडे यांना युतीच्या जागावाटपातील तिढ्यामुळे उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनीदेखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन मातब्बरांनी बंडखोरी केल्यामुळे कराड उत्तर व दक्षिणच्या राजकारणावर परिणाम होणार, हे ओळखून कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी उदय पाटील यांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनंती केली, तर उत्तरेत मनोज घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी काहींनी प्रयत्न केले.

पाच तारखेला अर्जाची छाननी झाली. आज सोमवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजण्याची वेळ होती. त्यामुळे आजच्या दिवसात काही घडामोडी घडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज माघारी न घेता बंडखोरी कायम ठेवली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 35 वर्षे आमदार असलेले विलासराव पाटील- उंडाळकर यांना डावलून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तेव्हाही उंडाळकर यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले होते. मात्र, त्यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीतही त्यांचे पुत्र उदय पाटील यांनी बंडखोरी केली आहे.

दक्षिणेत 13 तर उत्तरेत सहा उमेदवार रिंगणात
कराड उत्तरमधून 11 पैकी पाच अपक्षांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. तर कराड दक्षिणमधून 19 पैकी सहा अपक्षांनी माघार घेतली आहे. कराड दक्षिणमध्ये रयत संघटनेचे उदय पाटील यांच्यासह 13 उमेदवार रिंगणात आहेत. तर कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांच्यासह सहा उमेदवार निवडणूक लढणार आहेत. यापैकी कराड दक्षिणेत कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे अतुल भोसले व अपक्ष उदयसिंह पाटील तर उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे धैर्यशील कदम व अपक्ष मनोज घोरपडे यांच्यात मुख्य लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठांना या बंडोबांना थंड करण्यात यश न आल्याने या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुका रंगतदार होणार, हे निश्‍चित झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here