तापमान वाढीचा समुद्री जीवसृष्टीवर परिणाम

पुणे – जागतिक तापमान वाढीचा परिणाम समुद्रातील जीवसृष्टीवर सर्वाधिक होत असून, समुद्री जीवसृष्टीचा नाश वेगाने होत आहे. जमिनीवरील जीवसृष्टीच्या ऱ्हासापेक्षा हा वेग दुपटीने जास्त असल्याचे नुकतेच एका जागतिक संशोधनातून समोर आले आहे. समूद्रातील जीवसृष्टीच्या ऱ्हासामुळे पर्यावरणीय असमतोलाबरोबरच आर्थिक नुकसानदेखील सहन करावे लागणार असल्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

समुद्रातील मासे, विविध प्रकारच्या वनस्पती, जलचर हे समुद्री परिसंस्था आणि पर्यावरणातील अविभाज्य घटक आहेत. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे समुद्रातील जीवसृष्टी धोक्‍यात आली असून, अतिशय वेगाने या जीवसृष्टीचा ऱ्हास होत असल्याची नोंद शास्त्रज्ञांकडून करण्यात आली आहे. इंटरनॅशनल “जर्नल ऑफ नेचर’ या मासिकात नुकताच यासंदर्भात संशोधन अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनासाठी जगभरातील 400 समुद्री जीवांचा अभ्यास करण्यात आला आहे.

समुद्रात राहणारी जीवसृष्टी ही थंड पाण्यात राहात असल्याने साहजिकच त्यांची शरीररचना ही कमी तापमानात राहण्यासाठी झालेली असते. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचेही तापमान वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम या जीवसृष्टीवर होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या जीवसृष्टीला स्थलांतरासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळेच जमिनीवर राहणारे प्राणी-वनस्पती यांच्या ऱ्हासापेक्षा समुद्रातील जीवसृष्टीचा ऱ्हास वेगाने होत असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहे.

तातडीने उपाय करणे आवश्‍यक
महत्त्वाचे म्हणजे सागरी जीवसृष्टीच्या ऱ्हासामुळे सागरी संसाधनांवर आधारित अर्थव्यवस्थेच्या प्रदेशांचे यामुळे मोठे नुकसान होणार असून, मासेमारी सारखा व्यवसायावर याचा थेट परिणाम होईल, अशी भीतीदेखील शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तापमानवाढ ही समस्या गांभीर्याने घेत, त्यावर तातडीने उपाय करणे आवश्‍यक आहे, असा सल्ला शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.