वस्तीशाळा शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासणी होणार

पुणे – राज्यातील वस्तीशाळांमधील प्रशिक्षित व अप्रशिक्षित शिक्षकांनी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

 

नवी दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अधिसूचनेनुसार शिक्षकांसाठी निश्चित केलेली अर्हता 31 मार्च 2019 अखेर प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडून सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या. मुदतीत अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षकांची माहिती शासनाने मागविली आहे. त्यानुसार शासनाला माहिती सादर करावयाची असल्याने आठ दिवसात प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे माहिती सादर करण्यात यावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सूचित केले आहे.

जिल्हा, वस्तीशाळा शिक्षकाचे नाव, प्रशिक्षित की अप्रशिक्षित, प्रशिक्षित झाल्याचा दिनांक, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण की अनुत्तीर्ण, टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची दिनांक, अभिप्राय अशी सर्व माहिती सादर करणे गरजेचे आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी वस्तीशाळांवर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पदवीधर उमेदवारांना संधी देण्यात आली होती. त्यांना काम करता करता डी.एड., बी.एड. या शैक्षणिक अर्हतेबरोबरच “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची अटही घालण्यात आली होती. विविध प्रकारचे प्रशिक्षणही घेण्याबाबतच्या सूचनाही संबंधित शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोणी कोणी अर्हता पूर्ण केली याची सविस्तर माहितीची जमवाजमव करुन ती एकत्रित करण्यात येणार आहे. अर्हता पूर्ण न केलेल्या शिक्षकांवर शासनाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.