पालक संतप्त : किती जागांवर प्रवेश मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात
पिंपरी (प्रतिनिधी) – संपूर्ण राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असताना पिंपरी-चिंचवड शहरासाठी “आरटीई’ अंतर्गत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार, हे अजून शिक्षण विभागालाही माहीत नाही. शाळा नोंदणी प्रक्रियेला वाढवून देण्यात आलेली मुदत मंगळवार (दि. 11) रोजी संपल्यानंतरही शहरातील किती शाळांनी नोंदणी केली याची आकडेवारी अजून गुलदस्त्यात आहे. पालकांनी आरटीई कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केल्यानंतरही यावर्षी आरटीई अंतर्गत एकूण किती जागा उपलब्ध आहेत. याची माहिती मिळू शकली नसल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.
आरटीई कोट्यातून आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी हजारो पालकांची धडपड सुरु आहे. शिक्षण विभागातील अधिकारी मात्र आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे फारसे गांभिर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यापासून शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या प्रक्रियेमधून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षी शहरातील अनेक बड्या शाळांनी आरटीईसाठी नाव नोंदणी केलेली नाही. शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याआगोदर शहरातील केवळ 110 शाळांनी नोंदणी केली होती. त्यानंतर पुन्हा दोन दिवस शाळांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत किती शाळांनी नोंदणी केली याची आकडेवारीच शिक्षण विभागाकडे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे, यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील किती शाळांमध्ये आरटीई प्रवेश मिळणार हे अद्याप पालकांना माहीती झालेले नाही.
जबाबदारी असलेले कर्मचारी शहराबाहेर
आरटीई प्रवेशाची जबाबदारी ज्या दोन कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली होती. ते कर्मचारी ट्रेनिंगसाठी अमरावती येथे गेलेले आहेत. त्यामुळे, आरटीई पोर्टलवर किती शाळांनी नोंदणी केली व यावर्षी किती जागा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळाली नसल्याचे शिक्षण विभागातील जबाबदार अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे, शिक्षण विभाग आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे गांभिर्याने पहात नसल्याचे दिसून येते. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल पालकांतून संताप व्यक्त होत असून या प्रवेश प्रक्रियेच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांतून होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी आम्हाला शाळांबरोबर समन्वय ठेवता यावा, यासाठी दोन कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र ज्या कर्मचाऱ्यांकडे आरटीई प्रवेश प्रक्रियेची जबाबदरी देण्यात आली होती. ते कर्मचारी टेनिंगसाठी गेलेले आहेत. ते सोमवारी आल्यानंतर शहरातील किती शाळांनी नोंदणी केली व किती जागा उपलब्ध आहेत हे कळेल.
पराग मुंडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग